आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे वेध:बिहारमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करा; माेदींची नितीशकुमार यांना सूचना, शेतकऱ्यांच्या थेट खात्यांवर 6 हजार काेटी दिल्याचा दावा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजदचे उपाध्यक्ष रघुवंशप्रसाद सिंह यांचा राजीनामा, विराेधी पक्षाला धक्का

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे काैतुक करतानाच राज्यातील जनतेला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, असे म्हटले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ६ हजार काेटी रुपये पाठवण्यात आल्याचेही माेदींनी म्हटले आहे.

राज्यातील जनतेशी माेदींनी भाेजपुरीतून व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गुरुवारी माेदींच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा याेजनेबराेबरच अनेक उपक्रमांचा शुभारंभ झाला. ही याेजना २० हजार ५०० काेटी रुपयांची आहे. माेदी पुढे म्हणाले, बिहारमधील जनतेने पुराचा सामना केला. तसाच लाेकांनी काेराेनाचाही धाडसाने मुकाबला केला. राज्यातील पूरग्रस्तांच्या वेदनांची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नांतून पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. बिहारमधील शेतकऱ्यांना ६ हजार काेटी थेट खात्यावर देण्यात आले. सरकार सातत्याने कल्याणकारी याेजनांवर भर देत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न याेजनेअंतर्गत केंद्राने माेफत रेशन वाटप सुरू केले. त्याचा लाभ काेराेना काळात सामान्यांना झाला. ही याेजना दिवाळी, छटपूजा या सणापर्यंत वाढवण्यात आली आहे.

मत्स्यपालनासाठी प्राेत्साहन
राज्याबाहेरून परतलेल्या लाेकांना मत्स्यपालनासाठी प्राेत्साहन देण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. अनेकांनी पशुपालनातही रस दाखवला आहे. त्यांना विविध याेजनांतून मदत केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून बिहारमध्ये मत्स्यपालन याेजनेला सुरुवात झाली आहे. नितीशकुमार यांचे काैतुकनितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगली कामे सुरू आहेत. आता राज्याला पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यावर जास्त भर द्यावा लागेल. पाच वर्षांपूूर्वी राज्यातील केवळ २ टक्के घरापर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी पाेहाेचत हाेते. आता हे प्रमाण ७० टक्क्यांवर पाेहाेचले आहे. या प्रक्रियेत आता १.५ काेटी घरांपर्यंत जलवाहिन्या पाेहाेचल्या आहेत. केंद्राच्या जल जीवन मिशनअंतर्गत ही याेजना राबवली जात आहे. सरकारसाठी ही माेठी कामगिरी म्हणावी लागेल, असे माेदींनी भाषणात सांगितले. दरम्यान, व्हर्च्युअल मीटिंगला पशुसंवर्धन-मत्स्यमंत्री गिरिराज सिंह, संजीव बाल्यान, प्रतापचंद्र सारंगी यांची उपस्थिती हाेती. त्याचबराेबर उपमुख्यमंत्री सुशीलकुमार माेदी यांचीही उपस्थिती हाेती.

बिहारमधील विधानसभा िनवडणुकीच्या ताेंडावर मुख्य विराेधी पक्ष राजदला हादरा बसला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राजीनामा दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात पक्ष साेडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून मी तुमच्यासाेबत राहिलाे आहे. आता मात्र साेबत नाही, असे एका आेळीत लिहिलेले हे राजीनामापत्र असल्याचे सांगण्यात आले. सध्या लालू चारा घाेटाळ्यात रांचीच्या तुरुंगात आहेत. सिंह सध्या एआयआयएमएस नवी दिल्ली येथे उपचार घेत असून रुग्णशय्येवरून त्यांनी लालूंना पत्र पाठवले आहे. काेराेनानंतरचा उपचार ते घेत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैशाली मतदारसंघाचे पाच वेळा खासदार राहिलेले रघुवंशप्रसाद मनमाेहनसिंग सरकारच्या काळात अनेक पदांवर कार्यरत हाेते. लालू तुरुंगात गेल्यानंतर पक्षाची धुरा सांभाळणारे तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीवर रघुवंशप्रसाद फारसे समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. पक्षाकडून मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...