आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Attaches Importance To Work Done By Mother Who Lost Her Life In An Accident As A Housewife

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गृहिणी विनावेतन घरकाम करतात, त्यांचे कुटुंबाच्या आर्थिक विकासात योगदान; तरीही त्या आर्थिक विश्लेषणापासून दूर का?: सुप्रीम कोर्ट

पवनकुमार | नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टाने अपघातात प्राण गमावलेल्या आईने गृहिणीच्या रूपात केलेल्या कामाला दिले महत्त्व

‘ज्या महिला घरी राहतात, त्या काम करत नाहीत, हा रूढिवादी विचार आहे. तो बदलायला हवा. महिला घरांत पुरुषांच्या तुलनेत जास्त काम करतात.’ ही टिप्पणी सुप्रीम कोर्टाने रस्ते अपघाताच्या एका प्रकरणात भरपाई रक्कम वाढवताना केली. दिल्लीच्या एका दांपत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन मुलींनी भरपाई मागितली. ४० लाख रु. भरपाई देण्याचा आदेश वाहन अपघात दावा लवादाने विमा कंपनीला दिला. कंपनीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाने महिला गृहिणी असल्याने भरपाई कमी करून २२ लाख केली. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

गृहिणींचा घरकामात समर्पित वेळ आणि प्रयत्न पुरुषांच्या तुलनेत अधिक

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा, एस. अब्दुल नजीर आणि सूर्यकांत यांनी भरपाई ठरवताना मुलींच्या आईने गृहिणी म्हणून केलेल्या कामाला महत्त्व दिले. तसेच भरपाई रक्कम २२ लाख रुपयांवरून वाढवून ३३ लाख रुपये केली. न्यायमूर्ती रमणा यांनी वेगळ्या लिहिलेल्या निकालात म्हटले आहे की, महिलांचा घरगुती कामांत समर्पित वेळ आणि प्रयत्न पुरुषांच्या तुलनेत जास्त असतो. गृहिणी भोजन बनवते, किराणा आणि आवश्यक साहित्य खरेदी करते, मुलांच्या देखभालीपासून घराची सजावट, दुरुस्ती अशी कामे करते. ग्रामीण भागात तर महिला शेतात पेरणी, कापणी व जनावरांच्या देखभालीचेही काम करतात. त्यामुळे गृहिणीचे काल्पनिक उत्पन्न निश्चित करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदा व न्यायालय गृहिणींचे श्रम, सेवा व बलिदानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच भलेही महिला घरकाम विनावेतन करत असतील, पण त्यांच्या कामाचे कुटुंबाच्या आर्थिक विकासात योगदान असते. त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देतात. असे असूनही गृहिणींना पारंपरिकरीत्या आर्थिक विश्लेषणापासून दूर ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांना अनुसरून या मानसिकतेत बदल करणे ही आपली जबाबदारी आहे.

भारतात महिला किती काम करतात हे कोर्टाने सांगितले

न्यायमूर्ती रमणा म्हणाले की, देशात महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त काम करतात.जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात भारत सरकारने देशव्यापी सर्वेक्षण केले होते. घरांत महिला आणि पुरुष किती काम करतात हे जाणून घेऊ...

> घरकाम करणाऱ्या महिला : १५.९८ कोटी

> घरकाम करणारे पुरुष : ५७.९ लाख

> महिलांचे रोजचे घरकाम : २९९ मिनिटे (सरासरी १६.९%)

> पुरुषांचे रोजचे घरकाम : ९७ मिनिटे (सरासरी २.६%)

बातम्या आणखी आहेत...