आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्किस बानोची फेरविचार याचिका फेटाळली:DCW अध्यक्षा म्हणाल्या - सुप्रीम कोर्टातही न्याय मिळत नसेल तर कुठे जावे?

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानोची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेद्वारे बिल्किस यांनी गत मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यात कोर्टाने गुजरात सरकारला 1992 च्या तुरुंग नियमांतर्गत 11 आरोपींची सुटका करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने 2002 मध्ये बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार व तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असणाऱ्या 11 आरोपींची मुदतपूर्व सुटका केली होती.

DCW अध्यक्षा म्हणाल्या - सुप्रीम कोर्टातही न्याय मिळाला नाही, तर कुठे जाणार?

रिव्ह्यू पिटीशन फेटाळल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या - सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानोची याचिका फेटाळून लावली. बिल्किसवर वयाच्या 21 व्या वर्षी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या 3 वर्षीय मुलासह कुटुंबातील 6 सदस्यांची निघृण हत्या करण्यात आली. गुजरात सरकारने तिच्या सर्वच बलात्काऱ्यांची सुटका केली आहे. पीडितांना सुप्रीम कोर्टातही न्याय मिळणार नसेल, तर कुठे जावे?

न्या. बेला त्रिवेदी सुनावणीपासून दूर

तत्पूर्वी, मंगळवारी बिल्किस बानोच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठातील न्यायाधीश न्या. बेला त्रिवेदी यांनी आपले नाव वेगळे केले. त्यांनी असे करण्याचे कारण दिले नाही. पण त्यांनी हे प्रकरण दुसऱ्या एखादा खंडपीठाकडे सोपवण्याची विनंती केली. बिल्किसने गँगरेपच्या 11 आरोपींच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

2 याचिका केल्या होत्या दाखल

बिल्किस बानो यांनी 30 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात 2 याचिका दाखल केल्या होत्या. पहिल्या याचिकेत त्यांनी 11 आरोपींच्या सुटकेला आव्हान देत त्यांना तत्काळ तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या याचिकेत त्यांनी आरोपींच्या सुटकेला परवानगी देणाऱ्या आदेशावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. या खटल्याची सुनावणी महाराष्ट्रात झाली, तर मग गुजरात सरकार आरोपींची सुटका कसे काय करू शकते, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

गोध्रा कांडानंतर झालेल्या दंगलीत बिल्किसवर झाला होता गँगरेप

गोध्रा कांडानंतर 3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये मोठी दंगल उसळली होती. त्यात दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधीकपूर गावात संतप्त जमाव बिल्किस बानोच्या घरात शिरला होता. दंगेखोरांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बिल्किस आपल्या कुटुंबासह शेतात लपली होती. तेव्हा तिचे वय 21 वर्ष होते. तसेच ती 5 महिन्यांची गरोदरही होती.

दंगेधोरांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला. तिची आई व अन्य 3 महिलांवरही त्यांनी रेप केला. त्यानंतर तिच्या कुटुंबातील 17 सदस्यांपैकी 7 जणांची त्यांनी हत्या केली. 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत केवळ बिल्किस, एक व्यक्ती व 3 वर्षांचे बाळ वाचले होते.

गुजरात दंगलीत 750 मुस्लिमांचा बळी

27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातच्या गोध्रात साबरमती एक्सप्रेसच्या कोचला जमावाने आग लावली होती. त्यात अयोध्येहून परतणाऱ्या 57 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात उसळलेल्या दंगलीत शेकडो जणांचा बळी गेला होता. त्यात बहुतांश मुस्लिमांचा समावेश होता. केंद्राने मे 2005 मध्ये राज्यसभेत सांगितले होते की, गुजरात दंगलीत 254 हिंदू व 750 मुस्लिमा मारले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...