आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra OBC Reservation Vs Supreme Court Order । Supreme Court Verdict On Local Body Elections In Maharashtra । SC Orders EC To Announce Election Schedule Within Two Weeks

OBC आरक्षणप्रकरणी राज्य सरकारला 'सर्वोच्च' दणका:मनपा-झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा, 2 आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

नवी दिल्ली/मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत राज्यातील प्रलंबित महापालिका व झेडपी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे आता ओबीसी आरक्षणशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारला सर्वोच्च दणका

राज्यातील 18 महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या गोंधळानंतर ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुकांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी चांगलीच घेरले. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्या याचिकेवर 25 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. यासंदर्भातला अंतिम निकाल आज सुप्रीम कोर्ट दिला आहे. या निकालात दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

आरक्षण विरहित प्रभाग रचना

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण विरहित प्रभाग रचना जाहीर केली होती. अंतिम प्रभाग रचना दुरुस्तीसह प्रसिद्धीचे वेळ आली असताना अचानक राज्य सरकारने ओबीसी आरक्षण नसल्यामुळे विधिमंडळात विधेयक कायद्याद्वारे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता पावसाळा असल्याने जून किंवा जुलै महिन्यामध्ये निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने दाखल केले होते.

ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले नाही, तसेच ओबीसी आरक्षण बाबतही राज्य सरकार आपली स्पष्ट भूमिका मांडू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपच्या वतीने करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजाला बांधून ठेवण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 15 दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...