आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेमीफायनलमध्ये पाऊस झाला तर काय?:दोन्ही डावांत प्रत्येकी 10 षटकांचा खेळ होणे गरजेचे, पाऊस झाल्यास ग्रुप स्टेजचा निकाल महत्त्वाचा

मेलबर्न22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजचे सामने 6 नोव्हेंबरला संपुष्टात येतील. त्यानंतर 9 व 10 तारखेला 2 सेमीफायनल घेळले जातील. 13 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. या नॉकआउट सामन्यांसाठी ICC ने नियम जारी केलेत. हे नियम ग्रुप स्टेजच्या सामन्यांहून वेगळे आहेत. पाऊस झाल्याच्या स्थितीत काय होईल? संपूर्ण सामन्यावर पाणी फेरले गेले तर काय?, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली आहेत. चला तर मग जाणून घेऊन या प्रश्नांची विस्तृत उत्तरे...

सर्वप्रथम रिझर्व्ह-डेचा होणार वापर

पावसामुळे सेमीफायनल किंवा फायनलचा सामना ठराविक दिवशी पूर्ण झाला नाही, तर तो रिझर्व्ह डे अर्थात राखीव दिवशी पूर्ण केला जाईल. या दिवशी निश्चित तारखेला सामना ज्या स्थितीत थांबला, तेथून पुढे सुरू होईल. म्हणजे मॅच थांबलेल्या वेळी बॅटिंग करणाऱ्या संघाला 5 षटकांत 40 धावा हव्या असतील, तर राखीव दिवशी येथूनच मॅच पुढे सुरू होईल. सामना नव्याने खेळला जाणार नाही. ग्रुप स्टेजमध्ये सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नव्हता.

दोन्ही डावांत किमान 10 षटकांचा खेळ होणे आवश्यक

सेमीफायनल किंवा फायनल खेळण्याच्या नियमानुसार, सामन्यात किमान 10-10 षटकांचा खेळ होणे गरजेचे आहे. म्हणजे हा सामना विलंबाने सुरू झाला तरी कोणताही डाव 10 षटकांपेक्षा कमीचा होणार नाही.

दुसऱ्या डावात बॅटिंग करणारा संघ 10 षटकांपूर्वी सर्वबाद झाला किंवा त्याने तत्पूर्वीच धावांचे उद्दीष्ट पार केले तरच 10 षटकांचा खेळ होणार नाही. सामान्य टी-20 सामन्यांत किमान 5-5 षटकांचा खेळ होणे आवश्यक असते.

सामना टाय झाल्यास निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर

सेमीफायनलचा सामना टाय झाल्यास तर सुपर ओव्हर टाकली जाईल. सुपर ओव्हरमध्येही टाय झाला, तर आणखी एक सुपर ओव्हर टाकली जाईल. सामन्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत असे केले जाईल.

ICCने हा नियम 2019 च्या वनडे विश्वचषकाच्या फायनलनंतर तयार केला होता. मागील टी-20 विश्वचषकही याच नियमानुसार खेळला गेला होता. 2019 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड व न्यूझीलंडमध्ये खेळला गेला होता. हा सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हर टाकण्यात आली. पण त्यातही तो टाय ठरला. अखेर इंग्लंडने जास्त बाउंड्री मारल्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले.

मॅचवर पाणी फेरले तर काय?

सेमीफायनलचा सामन्यावर पावसाचे पाणी फेरले व विजेत्या संघाचा निर्णय झाला नाही तर सुपर-12 मधील कामगिरी कामास येईल. ICC च्या नियमांनुसार, या स्थितीत ग्रुपमध्ये क्रमांक एकवर असणारा संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजे भारत आपल्या ग्रुपमध्ये अव्वल राहून अंतिम 4 संघांत पोहोचला व सेमीफायनलच्या सामन्यावर पाणी फेरले गेले तर तो आपसूकच फायनलमध्ये पोहोचेल. या स्थितीत भारताचा सामना दुसऱ्या ग्रुपमधील क्रमांक-2च्या संघासोबत होईल.

पाऊस किंवा अन्य कारणांमुळे अंतिम सामना झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल. म्हणजे फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघांना संयुक्तपणे पुरस्कार प्रदान केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...