आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली भाजप नेते तजिंदर बग्गा यांना हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिल्ली पोलीस बग्गा यांना घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दिल्लीतून अटक केली होती. त्यांना मोहाली न्यायालयात हजर करण्यासाठी पंजाबला नेण्यात येत होते. अर्ध्या वाटेत पंजाब पोलिसांचे वाहन कुरुक्षेत्रात हरियाणा पोलिसांनी अडवले. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. तेथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असून भाजपचे कार्यकर्ते बॅरिकेड्स ओलांडून 'आप'च्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना नेण्याच्या विरोधात पंजाब सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान पंजाब सरकारने बग्गा यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्याची तसेच त्यांना हरियाणातच ठेवावे अशी मागणी केली. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचे नाकारले. या प्रकरणी हायकोर्टाने दोघांनाही आज सायंकाळपर्यंत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
पंजाब सरकारने हरियाणावर चुकीच्या पद्धतीने पंजाब पोलिसांना रोखल्याचे सांगितले. प्रत्युत्तरादाखल हरियाणा सरकारने सांगितले की, बग्गा यांना शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे दिल्ली न्यायालयाचे सर्च वॉरंट होते. त्यांच्या मॅसेजनंतरच बग्गा आणि पंजाब पोलिसांना कुरुक्षेत्रात थांबवण्यात आले. या आधारे त्यांना रोखण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्ली न्यायालयाने बग्गा यांना शोधण्यासाठी सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर न्यायालयाला सांगण्यात आले की, बग्गाचे लोकेशन हरियाणातील कुरुक्षेत्रातील थानेसर येथे दिसून येत आहे.
केजरीवाल यांना धमकावल्याबद्दल कारवाई
बग्गा यांना पंजाब पोलिसांनी तपासात सहभागी होण्यासाठी नोटीस दिली होती, परंतु ते त्यासाठी आले नव्हते. बग्गा यांच्यावर काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
बग्गाच्या जवळच्या मित्रांच्या माहितीनुसार, 50 पोलिस सुमारे 12 गाड्यांमध्ये त्यांच्या दिल्लीच्या घरी पोहोचले. नातेवाईकांनी सांगितले की, आधी काही पोलीस घरात आले आणि त्यांनी थोडावेळ चर्चा केली. त्यानंतर बाहेरून मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि बग्गा यांना घेऊन गेले. बग्गा यांचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. बग्गा यांच्या अटकेची माहिती आपचे आमदार नरेश बल्यान यांनी दिली.
वडील म्हणाले - पोलिसांनी माझ्या तोंडावर ठोसा मारला
तजिंदर बग्गांचे वडील प्रितपाल सिंग म्हणाले, "पंजाब पोलिसांनी तजिंदरला ओढून नेले. त्याला पगडीही घालू दिली नाही. जेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला थांबवून एका खोलीत नेण्यात आले. तिथे मला तोंडावर ठोसा मारण्यात आला. पंजाब पोलिसांनी माझा फोनही काढून घेतला. अरविंद केजरीवाल यांना माझ्या मुलाला जबरदस्तीने गोवायचे आहे. यानंतर प्रितपाल बग्गा यांच्या मुलाची माहिती घेण्यासाठी जनकपुरी पोलीस ठाणे गाठले.
कपिल मिश्रा म्हणाले- बग्गा खरा सरदार, घाबरणार नाही
भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, बग्गा हे खरे सरदार आहेत. अशा कृत्यांमुळे त्यांना घाबरवले जाऊ शकत नाही किंवा कमकुवत करता येत नाही. केजरीवाल यांची वैयक्तिक नाराजी आणि राग मिटवण्यासाठी पंजाब पोलिसांचा वापर केला जात असल्याचे मिश्रा म्हणाले. हा पंजाबचा आणि पंजाबच्या जनादेशाचा अपमान आहे.
काँग्रेस म्हणाली- केजरीवाल पंजाब पोलिसांचा वापर करत आहेत
काँग्रेसने बग्गा यांची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल आपल्या अजेंड्यासाठी पंजाब पोलिसांचा गैरवापर करत आहेत. बग्गा यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्यावर त्यांनी आक्षेप घेतला.
'आप'च्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता
दिल्लीतील भाजप नेते तजिंदर बग्गा यांच्याविरोधात पंजाबमधील मोहालीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपचे प्रवक्ते सनी अहलुवालिया यांच्या वक्तव्याच्या आधारे मोहाली सायबर क्राइम सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बग्गा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आयपीसीच्या कलम १५३ए, ५०५, ५०५(२) आणि ५०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बग्गा यांच्या एका वादग्रस्त ट्विटचा हवाला देण्यात आला आहे. जे दिल्ली विधानसभेत काश्मीर फाइल्स चित्रपटावर केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर करण्यात आले होते. बग्गा यांनी धमकीच्या स्वरात एकामागून एक ट्विट केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.