आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tank Cleaned With Cow Urine In Karnataka After Dalit Woman Drinks Water Latest News And Update

दलित महिलेने सार्वजनिक टाकीतील पिले पाणी:सवर्णांनी टाकी रिकामी करून केले गोमुत्राने शुद्धीकरण, कर्नाटकातील संतापजनक घटना

बंगळुरू10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलित महिलेने नळाचे पाणी पिल्यामुळे कथित सवर्ण समाजाच्या लोकांनी पाण्याची टाकी गोमुत्राने स्वच्छ केल्याची संतापजनक घटना कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात घडली आहे.

काय आहे घटना?

अनुसूचित जातीची एक महिला 18 नोव्हेंबर रोजी चामराजनगर जिल्ह्यातील हेगगोतारा गावात लग्न समारंभासाठी गेली होती. यावेळी तहाण लागल्यामुळे तिने गावातील पिण्याच्या टाकीच्या नळाचे पाणी पिले. ही गोष्ट तिथे उपस्थित लोकांनी पाहिली. त्यांनी त्या महिलेला तेथून हकलून दिले. त्यानंतर तिथे मोठा जमाव जमला. त्यांनी संपूर्ण टाकी रिकामी करून ती गोमुत्राने धुवून स्वच्छ केली. तिथे हजर एका व्यक्तीने या घटनेची तक्रार तहसीलदारांकडे केली.

तहसीलदारांकडून पुष्टी

स्थानिक तहसीलदार आय ई बस्वराज एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले की, "पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. पण तिचे गोमुत्राने शुद्धीकरण केल्याची मी पुष्टी करत नाही. या प्रकरणी तपास सुरू असून, दोषींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी तथ्य आढळले तर आरोपींवर भेदभावाचा गुन्हा दाखल केला जाईल."

समाजकल्याण विभागाची धाव

दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गावात पिण्याच्या पाण्याच्या अनेक टाक्या आहेत. तिथे प्रत्येकजण पाणी पिऊ शकतो. त्यांनी गावातील काही दलित व इतर मागासवर्गियांना (ओबीसी) गावातील सर्वच टाक्यांवर नेऊन पाणीही पाजले. या प्रकरणी तहसीलदार पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विस्तृत अहवाल पाठवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशा घटना सहन करणार नाही -सोमन्ना

कर्नाटक सरकारचे मंत्री व्ही सोमन्ना चामराजनगर जिल्ह्याचे प्रभारी आहेत. त्यांनी अशा प्रकारचा भेदभाव कदापी सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सोमन्ना यांनी या प्रकरणी पोलिसांनाही कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

बातम्या आणखी आहेत...