आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा नेक्सॉन EV ला आग:इलेक्ट्रिक स्कूटर्सनंतर कारला आग लागण्याची पहिली घटना, कंपनीसह सरकार करणार तपास

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता EV कारलाही आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुंबईत घडली. गुरुवारी पवईत टाटा नेक्सॉन ईव्हीला अचानक आग लागली. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला असून, त्यात अग्निशमन दलाचे जवान आग विझवताना दिसून येत आहेत. भारतात टाटाच्या इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, कार मालकाने नेक्सॉन आपल्या कार्यालयात चार्ज केली होती. त्यानंतर ते घरी निघाले असता कारमधून एक विचित्र आवाज आला. त्यानंतर इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये बिघाड झाल्याचा इशारा मिळाला. ते पाहून त्यांनी आपला कार रस्त्याशेजारी पार्क केली. त्यानंतर काही वेळातच कारने पेट घेतला.

टाटा मोटर्सकडून तपास सुरू

दुसरीकडे, टाटाने या घटनेचा तपास केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी म्हणाली -'या घटनेचा तपास सुरू आहे. त्यात जे काही पुढे येईल ते जाहीर केले जाईल. कंपनी आपली वाहने व त्यांच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. देशात जवळपास 4 वर्षांपासून 30 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी एकूण 10 लाख किमीहून अधिक प्रवास केला आहे. ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे.'

DRDO करणार प्रकरणाचा तपास

काही वृत्तांमध्ये या घटनेचा सरकारी पातळीवरही तपास केला जाणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळेशी चर्चा सुरू आहे. डीआरडीओने यापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याची चौकशी केली आहे. त्यात हलक्या दर्जाच्या बॅटऱ्यांमुळे आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

EV ला आग लागल्याच्या घटना घडतच राहणार

ओला इलेक्ट्रिकचे CEO भाविश अग्रवाल म्हणाले - 'इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना यापुढेही घडतील. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेल्या वाहनांमध्येही असे घडते. मात्र, डिझेल-पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना खूपच नगण्य आहेत. याआधी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना घडली होती.

Nexon मध्ये EV लिथियम-आयनची बॅटरी

Tata Nexon EV विषयी बोलायचे तर, ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. तिच्यात 30.2kWh लिथियम-आयनची बॅटरी लावण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 312 किमीची रेंज देते. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार अवघ्या 60 मिनिटांत चार्ज करता येते. पण नियमित चार्जरने यासाठी 8 तासांचा अवधी लागतो.

टेस्लाच्या कारलाही लागली होती आग

जगभरातील इलेक्ट्रिक कारला आग लागण्याच्या घटनांवर नजर टाकली, तर अनेक प्रकरणे समोर येतील. मे 2022 मध्ये टेस्ला मॉडेल Y ला पॉवर डाउन झाल्यानंतर आग लागली होती. घटनेच्या वेळी चालक कारच्या आत होता. त्याने खिडकी तोडून स्वतःचे प्राण वाचवले. ब्रिटिश कोलंबियामध्ये ही घटना घडली. जमील जुथा नावाचा व्यक्ती कार चालवत होता. त्याने 8 महिन्यांपूर्वीच EV विकत घेतली होती.

मे 2022 मध्ये टेस्लाने पेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

तुमच्या ई-वाहनाची काळजी कशी घ्याल?
काही गोष्टींची काळजी घेतल्यास ग्राहक आगीसारखे धोके बर्‍याच प्रमाणात टाळू शकतात.

  • इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने शिफारस केलेल्या चार्जरनेच इलेक्ट्रिक वाहन चार्ज करा.
  • तुमचे इलेक्ट्रिक वाहन जास्त वेळ उन्हात पार्क करू नका.
  • चार्ज करताना काळजी घ्या, पहिल्यांदा चार्ज करण्यापूर्वी प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्या.
  • इलेक्ट्रिक वाहनांचे जास्त चार्जिंग टाळा.
  • चार्जिंगसाठी चांगले सॉकेट व प्लग वापरा.
  • ओलसरपणा चार्जर व बॅटरी या दोन्हीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाचे त्यापासून संरक्षण करा.
बातम्या आणखी आहेत...