आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. आता भारतीय संघ पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रणनीतीवर काम करेल. वनडे विश्वचषक भारतातच होणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवाच्या कटू आठवणी बाजूला ठेवून नव्या जोमाने मैदानात उतरण्यास प्राधान्य देईल. विश्वचषक पुढील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान होईल. तत्पूर्वी भारतीय संघ जवळपास 25 एकदिवसीय सामने खेळेल.
टीम इंडियाचा तिसऱ्यांदा जगजेता बनण्याचा प्रयत्न
भारतीय संघाने 1983 साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये जाऊन विश्वचषक जिंकला होता. कपिपल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास रचला होता. 1983 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बलाढ्या वेस्ट इंडिजला अस्मान दाखवून अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी 2011 मध्ये भारताने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
मुंबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2019 च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडने पराभूत केले. आता 2023 च्या विश्वचषकात भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वषचक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
कर्णधार बदलणार?
टी-20 विश्वचषकातील मानहाणीकारक पराभवानंतर टीम इंडियात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही गडांतर येण्याची चर्चा आहे. वनडेमध्ये भारताकडे शिखर धवनसारखा मजबूत पर्याय उपलब्ध आहे. त्यातच सुनील गावस्कर यांनी हार्दिक पंड्याला टी-20चे कर्णधारपद सोपवण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ आगामी विश्वचषकापूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल दिसून येतील.
केएल राहुलच्या डोक्यावर टांगती तलवार
एकदिवसीय सामन्यात शिखर धवन कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. दुसरीकडे, टी-20 विश्वचषकात केएल राहुलची कामगिरी अत्यंत सुमार झाली. त्यामुळे टीम मॅनेजमेंट विश्वचषकाचे आव्हान लक्षात घेऊन नव्याने रणनीती तयार करू शकते. त्यात ओपनिंग स्लॉटमध्ये राहुलला संधी मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही. या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर व संजू सॅमसनवर विचार करण्याची गरज
भारताकडे श्रेयस अय्यर व संजू सॅमसन सारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांचा टीम इंडियात समावेश करण्याच्या मुद्यावर टीम व्यवस्थापन गांभीर्याने विचार करेल, असाही दावा केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.