आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. केरळमधील वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरमनजीक असणाऱ्या पुंगूड गावात फुटबॉल स्टेडियमची गॅलरी कोसळली. यामध्ये सुमारे 200 जण जखमी झाले. 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा गॅलरीत 2 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. गॅलरी कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणारा घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. दोन स्थानिक संघांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. गॅलरी पूर्ण भरल्यानंतरही आयोजकांनी प्रेक्षकांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
केरळच्या डिजिटल न्यूज पोर्टल मातृभूमीनुसार, हा फुटबॉल सामना कालिकावूच्या पुंगूड येथील एलपी स्कूलच्या मैदानावर सुरू होता. हा अखिल भारतीय सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होता. मलाप्पूर जिल्ह्याची ही अतिशय प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा आहे. ज्या प्रेक्षक गॅलरीत ही घटना घडली, तिथे 2000 हून अधिक लोक उपस्थित होते. आता याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तर पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आफ्रिका कप ऑफ नेशन्समध्ये 6 चाहत्यांचा मृत्यू -
या वर्षी 24 जानेवारीला आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान असाच एक भीषण अपघात झाला होता. या अपघाताने संपूर्ण जग हादरले होते. स्टेडियमच्या बाहेर प्रवेश करताना चेंगराचेंगरी झाली होती. ज्यात 6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले होते. प्री-क्वार्टर फायनलमध्ये कॅमेरून आणि कोमोरोस यांच्यात सामना होता. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. ओलेम्बे स्टेडियमची एकूण क्षमता 60 हजार प्रेक्षकांची होती, मात्र कोरोनामुळे केवळ 80 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला. रिपोर्टनुसार, सामना पाहण्यासाठी 50 हजारांहून अधिक लोक पोहोचले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.