आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात

पणजी / नितीश गोवंडे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गायक चटर्जींना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार

मांडवी किनारी गेली सोळा वर्षे वेळेवर नोव्हेंबर महिन्यात गोव्यात पार पडणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यंदा पावणेदोन महिने उशिरा होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा हजारोंनी चित्रपटप्रेमींची संख्या रोडावली असली तरी मोठ्या उल्हासात ५१ व्या इफ्फीला शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. तसेच यंदाच्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

दरवर्षी चित्रपट प्रेमी, चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थी हे ऑनलाइन नोंदणी करत १ हजार रुपये भरतात. या वेळी देखील आयोजकांनी शुल्क आकारले तेवढेच पण दरवर्षी प्रमाणे मिळणारे कॅटलॉग्ज, बॅग्ज देण्यात न आल्याने थोड्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण स्टॉलवर बघायला मिळाले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे येत्या नोव्हेंबर महिन्यात ५२ वा इफ्फी नेहमीसारखा दर्जेदार आणि सर्वोत्कृष्टरीत्या साजरा केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

आज आपण सगळे कोरोनासारख्या महामारीबरोबर लढत आहोत, मात्र आता व्हॅक्सिन आले असल्यामुळे या लढाईत भारत जिंकेल आणि कोरोनाची हार होईल असेही ते म्हणाले. दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांनी बोलताना एका खुर्चीवर बसून जगाची सफर घडवण्याची चित्रपटात क्षमता आहे. हे जग अनुभवता आले पाहिजे असे मत व्यक्त केले. दरम्यान, या वेळी बॉलीवूड कलाकारांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. इफ्फीत जगभरातील सिने क्षेत्रातील दिग्गजांना ‘होमेज’ या विभागात आदरांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय सिनेमा जगतातील १९, तर जगभरातील नऊ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.

गायक चटर्जींना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक बिस्वजित चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. १९७५ मध्ये बिस्वजित यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...