आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Bisleri President Said The Brand Was Sold As The Only Girl Was Not Interested, The Tata Group Would Buy The Company; My Daughter Loves Art, Travel And Photography

बिस्लेरीचे अध्यक्ष म्हणाले:एकुलत्या एक मुलीला स्वारस्य नाही म्हणून ब्रँड विक्रीस काढला, टाटा समूह खरेदी करणार कंपनी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीस आर्ट, प्रवास व फोटोग्राफीचा छंद

बाटलीबंद पाण्याचा बिस्लेरी ब्रँड आता टाटा समूहाचा हिस्सा होणार आहे. बिस्लेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान हा उद्योग टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सला विकणार आहेत. सुमारे ७ हजार कोटी रुपयांत हा सौदा होण्याची शक्यता आहे. ब्रँड का विकता आहात, हा प्रश्न विचारल्यावर ८२ वर्षीय चौहान म्हणाले, जड अंत:करणाने हा निर्णय मला घ्यावा लागला. कारण त्याला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाणारे कुणीही नाही. एक मुलगी आहे जयंती. परंतु तिला या व्यवसायात फारसा रस नाही. खरेदीसाठी अनेक उत्सुक आहेत. परंतु सचोटी व जीवनमूल्यांचा ध्यास बाळगणाऱ्या टाटा समूहाची निवड केली.

परदेशात फॅशनचे कोर्स केले
३७ वर्षीय जयंतीने अनेक परदेशी संस्थांमध्ये फॅशन स्टायलिंगचे कोर्स केले. २४ व्या वर्षी बिस्लेरी उद्योगाशी जोडली गेली. २०११ मध्ये मुंबई कार्यालयाचा कारभार सांभाळला. बिस्लेरीतील अनेक नव्या कल्पनांचे श्रेय जयंतीला जाते. तिला प्रवास, कलाविश्व आणि फोटोग्राफीचा छंद आहे.

दररोज दोन कोटी लिटर पाणी पॅकबंद करते बिस्लेरी कंपनी भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनी. पाण्याच्या बाजारपेठेत ६० % हिस्सा {१२२ प्लँट, रोज २ कोटी लिटर पाणी पॅक. देशभर ४,५०० वितरकांचे जाळे २०२३ मध्ये बिस्लेरीची उलाढाल २५०० कोटींवर जाण्याची शक्यता. देशात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ सन २०२३ अखेरपर्यंत ४० हजार कोटींवर जाऊ शकते. त्याचे प्रमाण ३५५३ कोटी लिटरपर्यंत असेल. बिस्लेरी खरेदी करणारी टाटा कंझ्युमर हिमालयन व टाटा कॉपर प्लस ब्रँडची सध्या विक्री करीत आहे.

ब्रँडकथा : बिस्लेरी ब्रँडचा इटलीमध्ये जन्म, साठच्या दशकात पार्लेने ५ लाखांमध्येच केला होता खरेदी
िबस्लेरीची कहाणी पार्ले ब्रँडशी संबंधित आहे. १९६१ मध्ये पार्ले समूहाची चौहान कुटुंबीयांतील ४ भावंडांमध्ये वाटणी झाली. शीतपेय उद्योग जयंतीलाल यांच्या वाट्याला आला. जयंतीलाल यांचा मुलगा रमेश मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूटमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेऊन परतला. व्यवसायात उतरताच रमेश यांनी ‘सोडा’चा समावेश केला. योगायोगाने १९६५ मध्ये इटलीच्या बिस्लेरी ब्रँडने मुंबईत उद्योग सुरू केला होता. इटलीचे सायनॉर फेलिस बिस्लेरी यांची ही अफलातून कल्पना होती. बिस्लेरीचे सोडा ब्रँडमध्ये रूपांतर करावे या उद्देशाने रमेश यांनी १९६९ मध्ये हा ब्रँड खरेदी केला. ५ लाखांत सौदा झाला. यानंतर पार्ले समूहाने थम्सअप, लिम्का, माझा, गोल्ड स्पॉट ही शीतपेये आणली. तथापि, १९९३ मध्ये शीतपेय उद्योग कोका कोला कंपनीला विकून त्यांनी सर्व लक्ष पाणी विकण्यावर केंद्रित केले. बिस्लेरी ब्रँडचा प्रचार एवढ्या प्रभावी पद्धतीने केला की तो शुद्ध पाण्याला पर्याय बनला.

बातम्या आणखी आहेत...