आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाऊन किती दिवस राहायला हवे हे कोणत्या आधारे ठरवत आहेत, याबाबत केंद्र सरकारने सांगावे. तसेच १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतर काय होणार आहे, अशी विचारणा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे. बुधवारी पक्षाचे नेते आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. या बैठकीत डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
सरकारने पॅकेज न दिल्यास राज्ये कसे चालतील : गहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, आमचे १० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. राज्यांनी पॅकेज देण्यासाठी पंतप्रधानांना वारंवार विनंती केली आहे. मात्र, केंद्राने आमचे म्हणणे ऐकले नाही. तर, छत्तीसगड असे राज्य आहे जेथे ८०% लहान उद्योग पुन्हा सुरू झाले असून जवळपास ८५ हजार मजूर कामावर परतले आहेत.
वस्तुस्थिती न जाणताच कोरोना झोनची निश्चिती : कॅप्टन
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दोन समित्या स्थापन करण्याचा सल्ला दिला. एका समितीने लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची योजना बनवावी आणि दुसरीने अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत सांगावे. दिल्लीत बसलेले लोक वस्तुस्थिती जाणून न घेता कोरोना झोन निश्चित करत अाहेत ही चिंतेची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
शुल्कवाढ करून सरकार कोणासाठी पैसे जमा करते आहे : प्रियंका
डिझेल आणि पेट्रोलवर केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवल्याने काँग्रेस संतप्त झाली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सवाल केला की, कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत असल्याचा फायदा लोकांना होत नसून जे पैसे गोळा होत आहेत त्यातूनही मजूर, मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योगांना मदत होत नाही. अखेर सरकार पैसे गोळा कोणासाठी करत आहे? तर, राहुल गांधी म्हणाले की, सध्या किमती कमी करण्याऐवजी पेट्रोल, डिझेलवर कर वाढवण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा असून तो परत घ्यावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.