आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील १३ राज्यांमध्ये कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या लोकांचे प्रमाण २५ दिवसांत अचानक वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देणे आवश्यक असल्याचे संकेत २१ जूनला सर्वोच्च न्यायालयाने दिले. नंतर ३० जूनला केंद्र सरकारला आदेश दिले की, भरपाईची रक्कम किती असावी, त्यासाठी कोण पात्र असेल हे सर्व ६ आठवड्यांत ठरवण्यात यावे. म्हणजे भरपाई मिळणे निश्चित झाले. या काळात देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले. २१ जूनपर्यंत देशात २.९९ कोटी रुग्ण होते, ३.८९ लाख मृत्यू झाले होते. म्हणजे मृत्युदर १.३०% होता. नंतर २२ जून ते १६ जुलैपर्यंत १०.८७ लाख रुग्ण आढळले, २४२७२ मृत्यू नोंद झाले. म्हणजे या काळात मृत्युदर होता २.३३%. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरातसह १३ राज्यांमध्ये २१ जूननंतर मृत्युदर वाढणे सुरू झाले. मात्र, १४७८ मृत्यू एकदम दाखवल्याने चर्चा फक्त मध्य प्रदेशचीच झाली. दुसऱ्या राज्यांनी गुपचूप रोज मृत्यूंचे आकडे वाढवणे सुरू केले, जे अजूनही सुरूच आहेत.
भास्कर एक्स्पर्ट... आता मृत्यू वाढण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही, आधीचे मृत्यू समायोजित केले जाताहेत
देशातील तीन प्रमुख शास्त्रज्ञ आणि माजी केंद्रीय आराेग्य सचिवांचे म्हणणे आहे की, आता मृत्यू वाढण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. राज्यांनी मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने करणे सुरू केले आहे.
विषाणू रात्रीतून बदलत नाही, मात्र मृत्यू अचानक वाढले आहेत
सध्या विषाणूत बदल झालेला नाही तसेच संसर्गाचा वेगही बदललेला नाही. विषाणूत रात्रीतूनच कोणताही बदल होत नाही. यामुळे ज्या राज्यांत मृत्युदर वाढला आहे त्या राज्यांनी मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने करणे सुरू केले आहे. - डॉ. समीरण पांडा, आयसीएमआर
योग्य आकडेवारीमुळे संसर्गाचा सामना करण्याचे धाेरण आखता येते
अचानक मृत्यू वाढण्यास शास्त्रीय आधार नाही. राज्यांनी ऑडिट सिस्टिम सुधारली आहे का हे बघायला हवे. महामारीचा सामना करण्यासाठी योग्य आकडेवारी गरजेची आहे. तेव्हाच योग्य धोरण आखता येते. - डॉ. रमण गंगाखेडकर, माजी मुख्य शास्त्रज्ञ, आयसीएमआर
रुग्णालयांतील स्थिती आधीपेक्षा चांगली, म्हणून मृत्यू वाढत नाहीयेत
मृत्यू वाढावेत अशी स्थिती आता नाही. असे असते तर रुग्णालयात गर्दी असती. रुग्णालयांत आधीपेक्षा स्थिती चांगली आहे. मृत्यूंचे ऑडिट करण्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. हा त्याचाच परिणाम आहे.- डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया
राज्यांमध्ये आधीचे मृत्यूही आता दाखवले जाताहेत असे वाटते
दुसऱ्या लाटेत रुग्णालये व यंत्रणेवर खूप ताण होता. त्या वेळी मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने झाली नसेल. काही राज्ये आता ती चूक दुरुस्त करत असतील तर चांगली बाब आहे. यामुळे पुढे योग्य धोरण आखण्यात मदत होईल. - प्रीती सूदन, माजी केंद्रीय आरोग्य सचिव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.