आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखा वाद:जावयासाठी आई-बापाची घटस्फोटापर्यंत गेली मजल, बापाने लावले मुलीचे लग्न, आईचा बहिष्कार

भोपाळ |वंदना श्रोतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईचा हट्ट : आपल्या पसंतीचाच जावई हवा
  • टो न पाहिल्याने झाला गाेंधळात गोंधळ

मुलीचे लग्न आपण ठरवलेल्या मुलाशीच व्हावे म्हणून एका जोडप्यात वाद इतका विकोपाला गेला की दोघांची घटस्फाेटापर्यंत मजल गेली. पती-पत्नीस मुलीचे लग्न त्यांना आवडलेल्या मुलाशी करून द्यायचे होते. पतीने पत्नीला न सांगता मुलीचे लग्नही ठरवून टाकले. त्यामुळे नवरा-बायकोत भांडणे लागली. त्यातून बायकोने मुलीच्या लग्नास जाण्यासच नकार दिला. ती सामान उचलून माहेरी निघून गेली. तेथून तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही दाखल केला. अर्जावर समुपदेशन करण्याची वेळ आली तेव्हा कौटुंबिक न्यायालयात समजले की, ज्या मुलाशी पत्नी लग्न लावून देणार होती त्याच मुलाशी नवऱ्याने मुलीचे लग्न लावून दिले होते. एकमेकांना त्यांनी फोटो न दाखवल्यामुळे व मुलाची व्यवस्थित माहिती जाणून न घेतल्याने हा घोटाळा झाला होता.

कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले, हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात मुख्य न्यायाधीशासमोर सुनावणीस आले होते. आता नवरा व बायकोत तडजोड झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात बैरागडच्या एका महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. न्यायालयाने समुपदेशनाचे आदेश दिले. समुपदेशकांनी दोघांना बोलावून घेतले. दोघांनी आपली बाजू मांडली. महिला म्हणाली, काही होवो, मला पतीसोबत राहायचे नाही. समुपदेशकाने कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले, माझ्या पसंतीच्या मुलाशीच मुलीचे लग्न लावून द्यायचे होते. त्यातच तिचे भले होते. पतीने माझ्या पसंतीच्या स्थळास नकार दिला. त्यामुळे मी आणि माहेरची माणसेसुद्धा लग्नाला गैरहजर होतो. आता मला पतीसोबत राहायचीही इच्छा नाही.

तेव्हा पती म्हणाला, मुलीचे लग्न ठरवले तेव्हा तुला हेच सांगत होतो की, एकदा मुलाचे छायाचित्र तर पाहून घे. पण तू काही ऐकून घेण्यास तयार नव्हतीस. मी माझ्या नातेवाइकांना या मुलांसाठी होकार दिला होता. यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशीच लग्न लावून देण्याची माझी जबाबदारी होती.

जावयाचे छायाचित्र पाहिले, धक्काच बसला
महिलेचे समुपदेशन सुरू असताना तिची नाना प्रकारे समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. समुपदेशकांनी सांगितले, मुलीचे लग्न तर झालेच आहे. आता नाराज राहून कसे चालेल? तुम्ही मुलीशी आणि पतीशी बोलतही नाहीत. आता किमान जावयाशी तर बोला. तो कसा दिसतो यासाठी किमान त्याचे छायाचित्र तर पाहा. तिने जेव्हा जावयाचे छायाचित्र पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. ती ओरडली, हाच मुलगा तर मी पसंत केला होता, असे अवस्थींनी सांगितले.

आता चूक मान्य, लग्नास न गेल्याची मात्र खंत
जावयाचे छायाचित्र पाहताच महिलेचा राग शांत झाला. आपण उगाच मुलीच्या लग्नास न जाण्याची चूक केली, अशी खंत तिला वाटत आहे. तिने पतीची माफी मागितली आणि मुलीला तिच्या लग्नानंतर प्रथमच फोनवर संपर्क केला. रागावर नियंत्रण ठेवले असते तर इतक्या महत्त्वाच्या प्रसंगास हजर राहण्यास मुकले नसते, अशा शब्दांत तिने आपली चूक बोलून दाखवली. गैरसमज दूर झाल्यानंतर नवरा-बायको हसत-खेळत न्यायालयातून बाहेर पडले.