आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजवरचा सर्वाधिक काळ म्हणजे 33 वर्षे काशी पीठाच्या जगद्गुरुपदी विराजमान असणाऱ्या श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा किलोभर वजनाचा सोन्याचा मुकुट शुक्रवारी पट्टाभिषेक कार्यक्रमादरम्यान नूतन जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी घालण्यात येईल.
नव्याने नेमण्यात येणाऱ्या जगद्गुरूंना विविध धार्मिक वस्तू देत त्यांच्यावर संस्कार करत सिंहासन आरोहण केले जाते. पट्टाभिषेक कार्यक्रम म्हणजे काय ही अनोखी माहिती मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य यांनी ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून दिली आहे. गुरुवारी रात्री नवउत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांना हळद लावणे, मस्ताभिषेक, लग्नातील दोरे धरण्याच्या ‘नुलू सुत्तादू’ कार्यक्रम झाला.
देशभरातील विविध शिवाचार्य आज काशीमध्ये सोहळ्यास राहणार हजर
संस्कार सोहळ्याने सुरुवात
नूतन जगद्गुरूंचे नूतन नामकरण करीत रजत सिंहासनावर बसवत त्यांचे सिंहासन आरोहण करण्यात येते. या वेळी त्यांच्यावर विविध संस्कार करण्यात येतात. हा विधी झाल्यानंतर विद्यमान जगद्गुरू नव्या जगद्गुरूंना शिरसाष्टांग दंडवत घालतात, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमावेळी उज्जैन पीठाचे सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे डॉ. कन्नड सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व काशी पीठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आदी प्रमुख मान्यवरांसह देशभरातील विविध शिवाचार्य उपस्थित राहतील.
काशी पीठाचे प्रतीक पिवळी पताका
हिंदू धर्माची उज्जैनी, केदार, काशी, रंभापुरी आणि श्रीशैल ही पाच प्रमुख पीठे आहेत. काशी पीठाचे प्रतीक पिवळ्या रंगाची पताका असून त्याला दंड असे संबोधतात. हा दंड बिल्व वृक्ष म्हणजे बेलाच्या झाडाच्या फांदीचा असतो. हा बिल्व दंड, चांदीचे कमंडलू, श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ, पंचमुद्रा म्हणजे अंगठी, पट्टबंधन तसेच सोन्याचा मुकुट आदींचा यात समावेश आहे.
असे असेल नव्या जगद्गुरूंचे नवे नाव
डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक झाल्यानंतर “श्रीमद् काशी सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, श्रीक्षेत्र काशी’ असे त्यांचे नामकरण होणार आहे.
मी १५ पट्टाभिषेक पाहिलेले आहेत
मी केदार पीठाचे २, काशी, श्रीशैल व रंभापुरी पीठाचे प्रत्येकी ३ आणि उज्जैन पीठाचे ४ असे एकूण १५ पट्टाभिषेक कार्यक्रम पाहिलेले आहेत. परंतु आजवर सर्वाधिक काळ पीठावर राहिलेल्या काशी जगद्गुरूंच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.
- श्री रेणुक शिवाचार्य, महास्वामीजी, मंद्रूप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.