आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Decision Of The Final Year Exams Has Been Postponed, Now The Supreme Court Will Hold A Hearing On August 10

परीक्षा होणार की नाही?:अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय पुढे ढकलला, आता सर्वोच्च न्यायालय 10 ऑगस्टला करणार सुनावणी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून वाद सुरू आहे. या वादानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात याविषयी सुनावणी होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.

कोरोनाच्या संकटात परीक्षा घेणे योग्य नाही अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला युवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. यामध्ये युवासेनेचाही समावेश आहे. युवासेनेनेही याविषयी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता या याचिकांवर आज निकाल येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कायम आहे. यामुळे काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. यासोबतच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य सरकारही या निर्णयावर ठाम आहे. मात्र यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला हव्यात याविषयावर ठाम आहे. तसेच सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यूजीसीकडून अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.