आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी ड्रोनद्वारे टेहळणी करण्याचा निर्णय, गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रेड अलर्ट जारी

श्रीनगर / सतीश वैराळकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्दी वाढताच परप्रांतीयांना सुरक्षा दलांच्या छावणीत न ठेवण्याचा निर्णय

पाकिस्तानसमर्थित अतिरेक्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले टार्गेट किलिंग रोखण्यासाठी परप्रांतीयांना सुरक्षा दलाच्या छावणीत थांबवण्याचा निर्णय एकाच दिवसात रोखण्यात आला. काश्मिरात एक लाखावर परप्रांतीय नागरिक कामासाठी आलेले आहेत. सर्वच नागरिक जर विविध संरक्षण दलांच्या छावणीत आश्रयासाठी आले तर सुरक्षा दल अतिरेक्यांविरुद्ध लढणार की नागरिकांची देखभाल करणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यासंबंधीचे तोंडी आदेश ऐनवेळी स्थगित करण्यात आले. श्रीनगर शहराची टेहळणी करण्यासाठी चार हिश्श्यांत विभागणी करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस प्रशासन आणि सुरक्षा दल मिळून ड्रोनद्वारे शहराची टेहळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशी शहराची विभागणी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ ऑक्टोबर रोजी जम्मूच्या दौऱ्यावर येत आहेत. काश्मिरात येण्यासाठी सुरक्षेची चाचपणी घेण्यासाठी विविध सुरक्षा एजन्सींच्या प्रमुखांना पाठवण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या, खासकरून काश्मीर विभागात श्रमिकांना अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. यासंबंधी प्रशासनाने १७ ऑक्टोबरला निमलष्करी दल आणि सैन्यांच्या छावणीत श्रमिकांना आश्रय देण्यासंबंधी तोंडी आदेश निर्गमित केले होते. परंतु काही सुरक्षा दलांच्या छावणीत मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाल्याने तेथील यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. श्रीनगर शहराच्या जवळच असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीत १८ ऑक्टोबर रोजी ६५० श्रमिक दाखल झाले. संबंधित श्रमिकांना सोयीसुविधा पुरवाव्या की अतिरेकी कारवाईविरोधात मोहीम राबवावी, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेवर पडला. संबंधित निमलष्करी दलाच्या वतीने स्थानिक जम्मू आणि काश्मीर पोलिस दलास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ६५० श्रमिकांना तेथून इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवले. निमलष्करी दलांच्या छावण्याही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. अशा सुरक्षा दलांच्या छावण्यांवर कधीही अतिरेकी हल्ला होऊ शकतो. सुरक्षा दले अतिरेक्यांचा बीमोड करतील की श्रमिकांना सांभाळतील, अशी अवस्था असल्याने यासंबंधीचा निर्णय मागे घेण्यात आला. स्थानिक पोलिस आता श्रमिकांसंबंधी सुरक्षेचा व त्यांना सुरक्षित जागी हलवण्याचा निर्णय घेत आहेत.

ड्रोनद्वारे अतिरेकी कारवायांचा बीमोड : श्रीनगर शहर आणि परिसरात अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आता स्थानिक पोलिस, बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि भारतीय सेनेद्वारे ड्रोनद्वारे निगराणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी श्रीनगर शहराला चार भागांत विभागण्यात आले आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे चार झोन करण्यात आले आहेत. संबंधित झोनमधील पोलिस दलाचे ठाणे प्रभारी आणि निमलष्करी दल व भारतीय सेनेचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. श्रीनगरच्या पूर्व झोनमध्ये गादरीबल, हरवल, निषाद, दलगेट आणि नेहरू पार्क भागाचा समावेश आहे. पश्चिम झोनमध्ये बेमिना, फ्रुटमंडी, गुलशननगर, पंतचौक आणि लासगंज, उत्तर झोनमध्ये उर्दू बझार, नोहाटा, सफाकदल, ईदगाह आणि खनियाल तर दक्षिण झोनमध्ये नातीपुरा, मेहजूबनगर, बटमालू, शहीदगंज, जहांगीर चौक, लालमंडी, करणनगर आणि आलूचीबाग भागाचा समावेश आहे.

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रेड अलर्ट जारी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर २४ ऑक्टोबरला येत आहेत. काश्मिरात शहा येण्याची शक्यता असून सुरक्षा यंत्रणा यासाठी सुरक्षेचा आढावा घेत आहे. सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी श्रीनगरात तळ ठोकून आहेत. शहा श्रीनगरला येणार असल्याने गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अलीकडे गुप्तचर संस्थांनी मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मिरात महिन्यातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारचे अलर्ट देण्यात येतात. सुरक्षा यंत्रणाही दररोजचा अलर्ट समजूनच काम करते. बहुतांश वेळा गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टमुळे घातपाताच्या कारवाया एक तर पुढे ढकलल्या जातात किंवा निश्चित स्थळापेक्षा इतरत्र केल्या जात असल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी आहे.

अतिरेक्यांच्या संख्येत वाढ
जम्मू आणि काश्मीर प्रांतामधील तरूणांना अतिरेकी संघटना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. पूंछ, मेंढर व काश्मीरच्या दुर्गम भागातून बर्फवृष्टीच्या काळात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरातून प्रशिक्षित करून पाठवले जात आहे. येथील भौगोलिक परिस्थिती अतिरेक्यांना घुसखोरी करण्यासाठी सोयीची आहे. ज्या प्रमाणात अतिरेकी मारले जात आहेत त्या प्रमाणात पुन्हा तयारही होत आहेत.. पूर्वी मोठ्या शस्त्राने हल्ला केला जायचा, आता पिस्तुलाने हल्ले हाेतात.

आठ दिवसांत नऊ जवान शहीद
११ ऑक्टोबर रोजी भारतीय सैन्यदलावर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. पूंछ सेक्टरमध्ये नायब सुभेदार जसविंदरसिंह, नायक मनदीपसिंह, शिपाई गजनसिंह, सिरानसिंह आणि वैशाख लाल तर मेंढर सेक्टरमध्ये १४ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी दोन जवान शहीद झाले. या दोन्ही सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी अतिरेक्यांविरुद्ध उघडलेले अभियान अद्यापही सुरूच आहे. १ ते १६ आॅक्टाेबर या कालावधीत १४ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

टार्गेट किलिंगमध्ये नागरिकांची हत्या : अतिरेक्यांनी २ ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या कर्णनगरातील माजिद अहमद गोजरी आणि मोहंमद शफी डार यांची हत्या केली.

बातम्या आणखी आहेत...