आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजवर चीनचा दक्षिणेतील भाग आणि भूतान, येथेच आढळलेल्या थ्री बॅडेड रोझपिंच या पक्ष्याच्या जोडीची पहिली नोंद, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधक चमूने अरुणाचल प्रदेशात केली आहे. या पक्ष्याचा आपल्या देशातील हा पहिला आढळ आहे. त्यामुळे हिमालय परिसरातील पक्षी प्रजाती, स्थलांतर मार्ग आणि एकूणच हिमाच्छादित प्रदेशातील पक्षी अधिवासावर नवा प्रकाश पडणार आहे.
बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहाय्यक संचालक डाॅ. गिरीश जठार यांच्या नेतृत्वाखाली हिमालयाच्या पूर्व भागात ‘ओरॅकल’ च्या सहकार्याने संशोधन प्रकल्प सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुणाचल प्रदेशात अधिक उंचीवर चालू असलेल्या सर्वेक्षणात ही थ्री बॅडेड रोझपिंच फक्ष्याची जोडी प्रथमच आढळून आली.
डाॅ. जठार म्हणाले, अरुणाचल प्रदेशात माझे सहकारी अथर्व सिंग आणि हिमाद्री मंडल यांना सर्वप्रथम आठ फेब्रुवारी २०२१ रोजी सेला पास येथे समुद्रसपाटीपासून तीन हजार ८५२ मीटर्स उंचीवर या अतिदुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडले. हा पक्षी इतका दुर्मिळ आहे, की त्याच्या जीवनक्रमाविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अतिशय लाजराबुजरा असल्याने हा पक्षी लपूनछपून वावरतो. भारतात तो प्रथमच आढळला आहे. आता त्याचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चीन आणि भूतान या वाटेवर स्थलांतर करतानाचा काॅरिडाॅर किंवा थांबा म्हणून या पक्ष्याने अरुणाचल प्रदेशात वास्तव्य केले असावे, असेही प्राथमिक निरीक्षणावरून वाटते,’असेही त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
चीनमध्ये तीन हजार मीटरवर आढळला
थ्री बॅडेड रोझपिंच हा पक्षी सूचिपर्णी वृक्षांचे जंगल संपून जिथे बर्फाळ प्रदेश सुरू होतो, तिथे आढळतो, अशी माहिती मिळते. चीनमध्ये तो तीन हजार मीटर्स उंचीवर आढळला आहे. भारतात मात्र तो तीन हजार ८५२ मीटर्स इतक्या उंचीवर आढळला, हे वैशिष्ट्य आहे. या पक्ष्याचे अधिवास, खाद्यसवयी, प्रजनन याविषयी कोणतीही माहिती नाही. आता तो देशात आढळल्याने सर्वांगीण अभ्यासाला वाव असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.