आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराची पायाभरणी आता १२०० भूमिगत खांबांऐवजी प्राचीन पद्धतीने होईल. याची रचना निश्चित करण्यासाठी देशातील ‘टॉप ८ टेक्नॉक्रॅट’ सदस्यांच्या समितीने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सोमवारी अहवाल सोपवला. दिल्ली आयआयटीचे माजी संचालक व्ही. एस. राजू समितीचे अध्यक्ष आहेत. ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र म्हणाले, अहवालात व्हायब्रोस्टोन कॉलम व कंटिन्युअस राफ्ट स्टोन या दोन तंत्रज्ञानाद्वारे पाया बांधणीची सूचना केली आहे. भूमिगत खांबांसाठी केलेले संशोधन वाया गेलेले नाही. त्यामुळे पाया रचनेत स्थैर्य आणण्यास मदत होईल. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी म्हणाले, २९ डिसेंबरला ट्रस्टच्या बैठकीत सूचनांवर विचार करून निर्णय घेतला जाईल.
किल्ल्यांचा पाया रचताना याच तंत्राचा अवलंब
जबलपूरच्या जैन मंदिर उभारणीत तांत्रिक बाबी हाताळणारे इंजिनिअर स्नेहल पटेल म्हणाले, ‘व्हायब्रोस्टोन कॉलम व कंटिन्युअस राफ्ट स्टोन तंत्रज्ञानाच्या आधारे प्राचीन काळात दगडांपासून भव्य मंदिरे, किल्ल्यांचा पाया रचला जायचा. आता आधुनिक यंत्रांद्वारे पाया तयार होतो. सध्या धरणे व उंच इमारतींचा पाया भक्कम करण्यासाठीही याच तंत्राचा वापर केला जात आहे. यात १० मिमी ते ८० मिमी दगडांचा उपयोग केला जातो. हे काम शास्त्राशी सुसंगत असावे यासाठी दगडासोबत चुना व औषधांचे मिश्रणही वापरले जाते.
कंटिन्युअस राफ्ट स्टोन : दगड, चुना, वाळूचा थर टाकतात
यात ठराविक खोलीपर्यंत खोदकाम होते. त्यानंतर दगड, वाळू व चुन्याचे थर टाकले जातात. प्रत्येक थराला ठराविक पद्धतीने दबाव टाकून स्थिरता व मजबुती दिली जाते. त्यावर प्लॅटफॉर्म तयार करून मंदिराचे बांधकाम होईल.
व्हायब्रोस्टोन कॉलम : दगडी कॉलम आणले जातात वर
यात जमिनीच्या खालून दगडांचे स्तंभ रचनेच्या विशेष पॅटर्नमध्ये जमिनीवर आणले जातात. पृष्ठभाग भूकंप आणि भूजलापासूनही सुरक्षित रहावा, इतका हा पृष्ठभाग मजबूत करण्यात येतो. वर राफ्ट तयार केली जाते.
मंदिराच्या तज्ज्ञ समितीत यांचा समावेश : अध्यक्ष प्रा. व्ही.एस राजू (माजी संचालक, आयआयटी दिल्ली), संयोजक प्रा. एन. गोपालकृष्णन (संचालक, सीबीआरआय, रुरकी) तर सदस्यांमध्ये प्रा. एसआर गांधी, प्रा. टीजी सीताराम, प्रा. बी. भट्टाचार्जी, ए.पी. मूल, प्रा. मनू संथानम, प्रा. प्रदीपता बॅनर्जींचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.