आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचे पितामह अनंताच्या प्रवासाला:चिपको आंदोलनाचे प्रणेते 94 वर्षीय सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

डेहराडून4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : 9 जानेवारी 1927, निधन : 21 मे 2021 - Divya Marathi
जन्म : 9 जानेवारी 1927, निधन : 21 मे 2021
  • राजेंद्रसिंह, मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित

पर्यावरणासाठी आयुष्य वाहून घेणारे व काश्मीर ते कोहिमापर्यंत पदयात्रा करणारे पर्यावरणाचे ‘पितामह’ सुंदरलाल बहुगुणा (९४) शुक्रवारी अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कोरोनामुळे ते ८ मेपासून रुग्णालयात होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते बहुगुणांनी दुपारी १२:०५ वाजता शेवटचा श्वास घेतला. ऋषिकेशमध्येच पूर्णानंद घाटावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

९ जानेवारी १९२७ ला उत्तराखंडच्या टिहरीत जन्मलेल्या बहुगुणांनी जंगल वाचवण्यासाठी १९७० च्या दशकात चिपको आंदोलन सुरू केले. त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली. त्यांचे कार्यकर्ते अवैध वृक्षतोडीविरुद्ध झाडांना मिठी मारून उभे राहायचे. त्यांचे हे आंदोलन जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. २००९ मध्ये पद्मविभूषण मिळाला. बहुगुणा यांनी टिहरी प्रकल्पाच्या आधी ४५ दिवस व नंतर ८४ दिवस उपोषण केले. या प्रकल्पामुळे मोठी लोकसंख्या बेघर होणार होती. त्यांच्या विरोधामुळे पी. व्ही. नरसिंह राव व एच. डी. देवेगौडांच्या कार्यकाळात दोन वेळा प्रकल्पाचा फेरआढावा घ्यावा लागला. मात्र २००१ मध्ये कामाला वेग आला व २००४ मध्ये धरण भरू लागले. बहुगुणा यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला.

भातशेतीवर म्हणाले, पाणी वाचवणारे भात खातील?

राजेंद्रसिंह, मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित जून १९९५ मध्ये मी गलताजीहून (जयपूर) गंगोत्री हा ४० दिवसांचा प्रवास बहुगुणाजींसोबत केला होता. त्यात भात न खाण्याचा नियम होता. एकदा चुकून भात शिजवला. त्यावर बहुगुणा म्हणाले, पाणी वाचवणारे भात खातील? माहीत आहे का १ किलो धान उगवण्यासाठी २२०० लिटर पाणी लागते? बहुगुणांनी हिमालयाच्या भगिनींची पर्यावरण चेतना चिपको आंदोलनाच्या रूपात जगाला दाखवली. या आंदोलनास भविष्याला सुधारण्याची चिंता म्हटले गेले. ते साधेपणा आणि सहजपणे मोठमोठी कामे करवून घ्यायचे. टिहरी धरणाविरुद्ध सत्याग्रहादरम्यान तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह स्वत: त्यांना भेटायला आले होते. बहुगुणा यांनी १९४९ मध्ये उत्तराखंडात दारूबंदीचा सत्याग्रह सुरू केला होता. त्यांनी १९८१-८३ दरम्यान काश्मीर ते कोहिमापर्यंत पदयात्रा करून पर्यावरणाला वाचवण्यासाठी देशात नवी चेतना निर्माण केली. त्यांना श्रद्धांजली वाहत आम्ही संकल्प करतो की, जोवर आम्ही जिवंत असू तोवर हिमालयाची हिरवळ आणि गंगेचे पावित्र्य, अविरत निर्मळतेसाठी सर्वस्व अर्पण करू.

बातम्या आणखी आहेत...