आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Most Interesting Story Of The Bravery And Prowess Of The Army From The Indo China Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतुलनीय धाडस:18 हजार फूट उंची, उभी चढण, कमी ऑक्सिजन अन् उणे तापमानात सैनिकांना ब्लॅक टॉपपर्यंत पोहोचवणारे कर्नल रणबीरसिंह जमवाल

उपमिता वाजपेयी | लेह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-चीन सीमेवरून सैन्याच्या शौर्याची आणि पराक्रमाची सर्वात रोचक कहाणी

कर्नल रणबीरसिंह जमवाल. तीन वेळा एव्हरेस्टवर चढाई करणारे हे धाडसी व्यक्तिमत्त्व. जगातील सात सर्वात उंच शिखरांना गवसणी घालून परतलेले देशातील एकमेव गिर्यारोहक. त्यांनीच गेल्या महिन्यात भारतीय सैन्याला पँगाँग भागातील शिखरांवर पोहोचवले होते. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला होता.

ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप, गुरंग हिल, मुकाबारी हिल, मगर हिलवर स्ट्रॅटेजिक पोझिशन घेण्यासाठी लष्कराने त्यांना तैनात केले होते. १८ हजार फूट उंचीवर असलेल्या या भागांपर्यंत पोहोचणे मोठे आव्हान होते. या भागात ऑक्सिजन कमी आहे. उभी चढण आणि समोर शत्रू. त्यामुळेच देश आणि जगातील सर्वोत्कृष्ट गिर्यारोहकांत समावेश असलेल्या कर्नल रणबीरसिंह जमवाल यांची या महत्त्वाच्या मोहिमेसाठी निवड झाली. त्यांना फेब्रुवारीतच लेहमध्ये पोस्टिंग देण्यात आली होती. ते सतत विशेष दलाच्या म्हणजे टुटू रेजिमेंटच्या सैनिकांसोबत या कठीण चढाईची तयारी करत होते. ही तयारी फेब्रुवारीपासूनच सुरू होती.

गेल्या महिन्यात ही मोहीम पूर्ण करण्यात आली. कर्नल जमवाल जेव्हा आपल्या चमूसह वर पोहोचले तेव्हा कडाक्याची थंडी होती. रात्रीच्या वेळी तापमान उणे १०-१५ अंशापर्यंत जात होते. त्या जागेपर्यंत आपले निवडक सैनिकच पोहोचू शकले आहेत. त्यामुळेही ही मोहीम आव्हानात्मक होती. त्यांना आणि त्यांच्या चमूला एक-दोन तास झोपण्याची संधी मिळते, २०-२० तास ड्यूटी करावी लागते आहे. या भागात लष्कर २४ तास पहारा देत आहे, त्याचे कारण म्हणजे समोर चीन आहे आणि तो काहीही करू शकतो. २९-३० ऑगस्टच्या रात्री या सतर्कतेमुळेच भारतीय सैनिक चीनचा मुकाबला करू शकले आणि त्याचे श्रेयही कर्नल जमवाल यांना जाते. तेथे सैन्याकडे पिण्याचे पाणीही नाही, हमालांद्वारे मोठ्या मुश्किलीने पाणी आणि इतर साहित्य पोहोचवले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवान पँगाँग भागात स्पांगुर गॅप, रिजुंग पास, रेकिंग पासमध्ये सज्ज आहेत. यामुळे लडाखच्या या भागातून आता भारत चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकतो. शिवाय चिनी लष्कराच्या एक महत्त्वाचा तळ आता भारताच्या रेंजमध्ये आहे.

कर्नल जमवाल जवान म्हणून जाट रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. काश्मीरमध्ये लष्कराच्या एका स्कूलमध्ये ते प्रशिक्षक होते. सियाचीन आणि लडाखच्या भागात पोस्टिंग देण्यापूर्वी या शाळेत प्रशिक्षण दिले जाते. जम्मूचे रहिवासी जमवाल यांना २०१३ मध्ये गिर्यारोहणातील सर्वोच्च तेनसिंग नोरगे पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे वडीलही लष्करात होते. २०११ मध्ये ते भारतीय लष्कराच्या महिला पथकाचे लीडर होते.

हिमवादळात अडकल्यामुळे एक बोटही कर्नल जमवाल यांनी गमावले

२००९ मध्ये उत्तराखंडमध्ये माउंट मानावर चढाई करताना हिमवादळात अडकल्याने कर्नल जमवाल यांना आपले एक बोट गमवावे लागले. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप झाला तेव्हा जमवाल बेस कॅम्पमध्ये होते. या भूकंपात बेस कॅम्पमधील २२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. कर्नल जमवाल सुरक्षित राहिले. नंतर त्यांनी मदतकार्यात अनेकांचे जीव वाचवले.