आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Numbers Of Anil Ambani And Former CBI Chief Were Added To The List Of Spies During The Rafale Controversy

हेरगिरीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट:राफेल वादादरम्यान हेरगिरीच्या यादीत टाकले अनिल अंबानी व माजी सीबीआय प्रमुखांचे नंबर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आलेले फोन नंबर फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नव्हते. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकही टार्गेटवर होते. इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत नवे गौप्यस्फोट करणाऱ्या १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने गुरुवारी खुलासा करत सांगितले की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर राफेल कराराशी संबंधित उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकले होते.

‘फॉरबिडन स्टोरीज’नुसार, आलोक वर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ८ फोन नंबर पेगाससच्या देखरेख टार्गेटच्या यादीत टाकण्यात आले होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने त्याला दुजोरा दिला आहे. पेगाससच्या निशाण्यावरील ५० हजार नंबर्सच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट शेकडो भारतीय नंबर्सची पडताळणी झाली आहे. गुरुवारी त्याचा एक वृत्तांत समोर आला. त्यात नवे गौप्यस्फोट करण्यात आले.

प्रशांत भूषण, अरुण शौरींनी आलोक वर्मांना राफेल कराराशी संबंधित फाइल दिली होती, नंतर ३ आठवड्यांनी त्यांना हटवले
वर्मांना हटवले जाण्याच्या तीन आठवडे आधी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी त्यांची भेट घेतली होती. वर्मांना राफेल कराराशी संबंधित एक फाइल देत चौकशीची मागणी केली होती. तथापि, वर्मांनी एफआयआर दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली नव्हती. पण वर्मा राफेल प्रकरणाची चौकशी सुरू करू शकतात, अशी जोरदार चर्चा होती.

वर्मांव्यतिरिक्त त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाच्या खासगी नंबरचाही पाळत ठेवण्याच्या यादीत समावेश झाला. वर्मांचा एक नंबर टाकल्यानंतर एक तासानेच सीबीआयचे दोन इतर वरिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना आणि ए. के. शर्मांचे नंबरही यादीत समाविष्ट करण्यात आले. वृत्तानुसार अस्थाना, शर्मा, वर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे काही काळासाठीच लीड डेटाबेसमध्ये आली. २०१९ मध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वर्मांच्या निवृत्तीबरोबरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर पाळत यादीतून हटवले होते. वर्मा, शर्मा आणि अस्थानांनी पेगासस प्रोजेक्टच्या खुलाशांवर आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अॅम्नेस्टीने म्हटले- आम्ही हेरगिरीच्या दाव्यांवर कायम
हेरगिरीचा खुलासा करणाऱ्या समूहात अॅम्नेस्टी इंटरनॅशनलही आहे. तिने म्हटले की, आम्ही पेगासस प्रोजेक्टच्या चौकशीतील निष्कर्षांवर ठाम आहोत. हा डेटा नि:संशयपणे पेगाससमार्फत हेरगिरीसाठीच्या संभाव्य नावांशी संबंधितच आहे. संघटनेने म्हटले की, संपूर्ण प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आमच्या नावाने निराधार बातम्या दिल्या जात आहेत.

दावा : रिलायन्स एडीए ग्रुपचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन चीफ जेसुदासन आणि त्यांच्या पत्नीच्या नंबरवरही पाळत
खुलाशानुसार, २०१८ मध्ये जेव्हा राफेल लढाऊ विमान करारावर राजकीय वाद सुरू होता, त्यादरम्यान रिलायन्स एडीए ग्रुपचे अनिल अंबानींचा नंबर पेगाससच्या पाळतीच्या यादीत समाविष्ट होता. राफेल करारात कसे एका विशेष कंपनीला भागीदार निवडण्यात आले हे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितले होते, तेव्हाची ही गोष्ट. अनिल यांच्या कंपनीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन चीफ जेसुदासन आणि त्यांच्या पत्नीचे नंबरही पाळतीच्या यादीत समाविष्ट होते. अनिल अंबानींसाठी संकटमोचक मानले जाणारे जेसुदासन यांचे नाव यादीत २०१८ मध्ये आले. या वर्षाच्या मध्यापासून अखेरपर्यंतचा काळ कंपनीसाठी आव्हानात्मक होता. तथापि, डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी राफेल वादाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. जे नंबर यादीत समाविष्ट आहेत, त्यांचा वापर अंबानी सध्या करतात की नाही, हे स्पष्ट नाही.

फॉरबिडन स्टोरीजनुसार, अनिल अंबानींचा नंबर फक्त राफेल करारापर्यंतच सीमित होता, असे म्हणणे शक्य नाही. यादरम्यान जोडलेल्या इतर नंबरच्या अभ्यासावरून, संरक्षण उद्योगांशी संबंधित अनेक लोकांवर पाळत होती, हे समजते. डॅसो एव्हिएशनचे भारतात प्रतिनिधी राहिलेले वेंकट राव पोसिना, साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजित सियाल आणि बोइंग इंडियाचे प्रमुख प्रत्युषकुमार यांचे नंबरही लीक झालेल्या डेटाबेसमध्ये आहेत. एनर्जी ईडीएफ या फ्रान्सच्या कंपनीचे प्रमुख हरमनजित नेगींचा नंबरही डेटाबेसमध्ये आहे. ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉँ यांच्या भारत दौऱ्यात अधिकृत प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.

स्पायवेअरच्या निर्यातीसाठी नियम आणखी कठोर केले जाऊ शकतात : इस्रायली सरकार
तेल अवीव | पेगासस स्पायवेअरचा वापर पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यासाठी करण्यात आल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी इस्रायलमध्ये आयोग स्थापण्यात आला आहे. इस्रायलने सरकारने म्हटले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर पेगासससारख्या सायबर अस्त्रांच्या निर्यातीचे नियम कठोर करावेत का, याचा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा आणि सरकारमधील मंत्र्यांचे मोबाइल नंबर पेगाससच्या यादीत आल्यानंतर सायबर सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

बातम्या आणखी आहेत...