आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:मुलीने परदेशात खेळावे म्हणून आई-वडिलांनी शेती गहाण ठेवली, कर्ज फेडण्यासाठी ती राबते शेतात

दिलीप जयस्वाल | अंबिकापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्तीसगडची नेहा कुजूर राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज आहे
  • गेल्या वर्षी थायलंड जाण्यासाठी पित्याने घेतले ३० हजारांचे कर्ज

कुस्ती आणि तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय क्रीडापटू असलेली नेहा कुजूर आता आई-वडिलांसोबत शेतात धानाची लागवड करते आहे. विशेष म्हणजे, मुलीला परदेशात खेळण्यासाठी जाता यावे म्हणून नेहाच्या आई-वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते. त्यामुळे वडिलांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नेहा शेतात राबते आहे. नेहा छत्तीसगडमध्ये अंबिकापूरजवळील कछारडीह गावातील रहिवाशी आहे. नेहा सांगते, माझे वडील गावाचे कोतवाल आहेत.

परंतु मला परदेशात पाठवून देण्याइतकी त्यांची ऐपत नाही. यासाठी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली तेव्हा वडिलांनी थायलंडला पाठवण्यासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले हाेेते. त्यासाठी शेत गहाण ठेवले होते. तेव्हा मी पासपोर्ट काढला आणि दिल्लीला गेले. मला अल्पवयीन म्हणून परदेशात पाठवण्यात आले नाही. आता कर्ज फेडण्याची चिंता लागली आहे. त्यामुळे आई-वडिलांसोबत मी शेतात काम करते आहे. आता धान लावला.

नेहाचे वडील विदेश्वर कुजूर यांचे ८ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते सांगतात, नेहाच्या खेळण्याने आम्हाला काहीच आर्थिक फायदा होणार नाही. परंतु नेहा खेळात पुढे जाईल,आपल्या गावाचे, देशाचे नाव उज्जवल करेल. म्हणून कर्ज काढले. नेहाने नेपाळमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धा गाजवली. तिला प्रमाणपत्रासोबत पदकानेही सन्मानित करण्यात आले. याशिवाय दिल्ली व नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग घेतला आहे. अनेक पदके तिने स्वत:च्या व संघाच्या नावावर मिळवली आहेत.

शेजाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या शेतात करते काम

नेहा म्हणाली की एकदा माझ्या आजी- आजाेबांनी मला २० हजार रुपयाचे कर्ज दिले हाेते. त्यामुळे दुसऱ्या राज्यात खेळायला जाऊ शकले. आई - वडिलांनी भाजी विक्री करून हे कर्ज फेडलेे. या वर्षीही शेजारच्यांकडून आपल्या शेतात काम करवून घेत आहे. त्या बदल्यात तीही काम करू शकेल या अटीवर. त्यामुळे त्यांच्या शेतासाठी कमी खर्च लागेल.