आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत:विरोधकांचे NCP प्रमुखांच्या नावावर एकमत, मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली भेट, 'आप'ही संपर्कात

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर प्रामुख्याने चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी त्यांचे मतैक्य झाले तर शरद पवार विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची त्यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेत दिले. खरगेंनी या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली आहे. विशेष म्हणजे रविवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही पवारांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आहे.

शरद पवार यांचे अनेक आघाड्या व आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला एकत्र आणून भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बेदखल करण्यातही त्यांचे महत्वाचे योगदान होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवार यांनी दुसऱ्या सर्वच चाणक्यांना धूळ चारल्याचे विधान केले होते. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अजित पवारांच्या मदतीने रातोरात सरकार स्थापन केले. पण, पवारांच्या चाणक्यनितीमुळे ते अवघ्या 3 दिवसांतच कोसळले.

15 जून रोजी ममतांनी बोलावली बैठक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधकांच्या 22 नेत्यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी त्यांना 15 जून रोजी होणाऱ्या एका संयुक्त बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक दिल्लीतील कॉन्स्टीट्युशन क्लबमध्ये होणार आहे.

हे नेते होणार बैठकीत सहभागी

ममतांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे सीएम हेमंत सोरेन व पंजाबचे सीएम भगवंत मान आदी 22 नेत्यांना पत्र लिहिले आहे.

24 जुलै रोजी संपत आहे कोविंद यांचा कार्यकाळ

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यानंतर 21 जुलै रोजी मतमोजणी होईल. घटनात्मक तरतुदींनुसार देशातील विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...