आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवारी लुधियानामध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात या मॉडेलनुसार लसीकरण होणार आहे. ड्राय रनमधील त्रुटी दूर करून देशभरात लसीकरण सुरू होईल. अशा प्रकारचा ड्राय रन चार राज्यांतील आठ जिल्ह्यांत झाला. ड्राय रनमध्ये खरी लस लावली जात नाही. लसीकरणाच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाते. लुधियानामध्ये ७ सेंटर तयार करण्यात आले होते.
या केंद्रांवर १७५ लाभार्थींना मॉक ड्रिलचा भाग बनवण्यासाठी सोमवारी एसएमएस पाठवण्यात आले होते. त्यापैकी १७४ ने मॉक ड्रिलमध्ये भाग घेतला. १ लाभार्थी वैद्यकीय रजेवर असल्यामुळे मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मॉक ड्रिलमध्ये लाभार्थीचे लसीकरण केंद्रावर पोहोचणे, त्यांचा प्रवेश, नोंदणी, लसीकरण व देखरेखीत ठेवणे इत्यादी गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मॉक ड्रिलमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.
कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला चार टप्प्यांतून जाणून घ्या...
स्टेप-1 : संदेश दाखवला, नाव पडताळणीने प्रवेश
लाभार्थीने एसएमएस दाखवला, नावाच्या पडताळणीनंतर प्रवेश. वेळ-१ मिनिट. लाभार्थीला सोमवारी मिळालेला एसएमएस मंगळवारी प्रवेशद्वारावर दाखवला. गार्डने यादीत त्याची खात्री केली. तापमान बघितले आणि लाभार्थीला प्रतीक्षालयात बसण्याची सूचना केली.
स्टेप-2: नोंदणीवेळच्या आेळखपत्राची केली मागणी
वेटिंग रूममधून आशा वर्करने लाभार्थीला नोंदणी कक्षात नेले. हातांचे सॅनिटायझेशन केले. नोंदणी कक्षातील आयटी इन्चार्जद्वारे कोविन पोर्टल सुरू करण्यात आले. नावाची विचारणा झाली. पोर्टलवर नाव टाइप केल्यानंतर सर्व माहिती पोर्टलवर दिसली. त्यानंतर आेळखपत्राची विचारणा झाली. नोंदणीवेळी दिलेले आेळखपत्रच तेथे दाखवावे लागेल. आयटी प्रमुखांनी त्याची माहिती पोर्टलवर नोंदवली.
स्टेप-3: व्हॅस्किनेटरने सांगितले लसीचे नाव
आयडी कार्ड दाखवल्यानंतर इन्चार्जद्वारे लाभार्थीला लसीकरणाच्या ठिकाणी पाठवले. येथे व्हॅक्सिनेटरने कोविड-१९ ची कोणती लस देण्यात येत आहे, याची माहिती दिली. ही लस उजव्या हाताला दिली. त्यानंतर रुग्णाला डोकेदुखी, ताप, चक्कर जाणवल्यास अधिकारी किंवा व्हॅक्सिनेटरशी किंवा मोबाइलवर संपर्क साधता येईल. तरीही समस्या राहिल्यास १०४ किंवा १०७५ वर संपर्क साधून रुग्णालयात दाखल होता येेते.
स्टेप-4: देखरेखीखाली ३० मिनिटे बसणे गरजेचे
लसीकरण केल्यानंतर रुग्णाला देखरेख कक्षात आशा वर्करने नेले. तेथे लाभार्थीच्या हातांना सॅनिटाइझ करण्यात आले. त्याशिवाय लाभार्थीच्या नावासमोर नोंद करण्यात आली. कक्षात आल्याची वेळही नोंदवण्यात आली. त्यानंतर पल्स, हार्ट रेट, ऑक्सिजनची पातळीही मोजण्यात आली. प्रत्येक आसनावर वृत्तपत्र होते. अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांनी लाभार्थीस बाहेर जाऊ दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.