आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना कोठडीत टाकणारे खरे तर रावण आहेत. महाराष्ट्रात आता रामराज्य येईल. कोणतेही साधूकांड होणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे सेनेचे ४० आमदारही सोबत होते.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा होता. रविवारी ते अयोध्येला पोहोचल्यानंतर त्यांनी हनुमानगढी तसेच श्रीराम मंदिराच्या बांधकामस्थळी भेट दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारंवार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगून भाजप आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार एकच असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंपेक्षा आपण कडवट हिंदुत्ववादी आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. हनुमान चालिसाप्रकरणी राणा दांम्पत्याला कोठडीत टाकल्याबद्दल तसेच पालघरमधील साधू हत्याकांडाचा संदर्भात शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात रावणराज्य असल्याची टीका काही जण करत आहेत. महाराष्ट्रात साधू-संतांची हत्या झाली ते काय रामराज्य होते का, असा सवाल शिंदेंनी केला. या वेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. परदेशात जाऊन देशावर टीका करणारे देशद्रोही आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी घरात बसून काम करणारा नाही
महाराष्ट्रात अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी ऑफिस किंवा घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही. मी जमिनीशी नाते असणारा मुख्यमंत्री आहे. प्रभू रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाले, अशी खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
योगी-शिंदे भेट : खास मेजवानीचे आयोजन
अयोध्या दौरा आटोपून सायंकाळी मुख्यमंत्री शिंदेंसह ४० आमदार,मंत्री लखनऊ येथे गेले. तिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खास मेजवानी दिली. या वेळी शिंदे आणि योगी यांच्यात बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. योगी यांच्यामुळे रामलल्लाच्या अयोध्यानगरीत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे शिंदे म्हणाले.
अयोध्येतील महाराष्ट्र भवनास शिवसेनाप्रमुखांचे नाव
अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जागा देण्यासाठी विनंती करण्यात आली असून या भवनास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळे नाही. अयोध्येतील महाराष्ट्र भवनामुळे रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.