आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The State Of Affairs Has Changed Since Uddhav Thackeray Became The Chief Minister Ravi Rana

राणा दाम्पत्याची पत्रकार परिषद:म्हणाले- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा, मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या काही दिवसांपासून राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेले राणा दाम्पत्याने नवी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार, मुंबई महापालिकेचा कारभार यावर कडाडून टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. 14 मे रोजी दिल्लीतील हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर रवी राणांची टीका

आमदार रवी राणा म्हणाले की, इंग्रजांनी लावलेली कलमे अनेक महान व्यक्तींवर लावण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्याने आमच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी इंग्रज काळापासूनच्या कायद्यावर मोठा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली, राज्यावरील अरिष्ट, साडेसाती टळण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार होतो. पण आम्हाला १४ दिवस तुरुंगात डांबले, राजद्रोहाचे कलम लावले.

देशाचे पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि कायदा मंत्री किरण रिजीजू हे असे जुनाट कायदे मोडून काढत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तरीही मुख्यमंत्री मात्र इंग्रजांच्या कायद्यांचा वापर करून आम्हाला तुरुंगात डांबत आहेत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला, याबद्दल आम्ही कोर्टाचे आभार मानतो.

माझा एकच फ्लॅट, परबांच्या 15 फ्लॅटवर कारवाई होणार का?

आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना चांगल्या पदाचे आमिष दाखवले, एका महिला खासदाराच्या घरात घुसून तिला तुरुंगात टाकले. 23 तारखेला यावर सुनावणी आहे. मुंबई महापालिकेने आम्हाला नोटीस दिली. 2007 मध्ये बांधली गेलेली इमारत आम्ही 7-8 वर्षे राहिलो. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे, मात्र अनिल परबांचे 15 फ्लॅट आहे हे ते विसरले असतील. मुख्यमंत्र्यांच्या प्रॉपर्टी आहेत. तरीही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मेहनतीने एक फ्लॅट घेतला. आता त्यावर कारवाई केली जात आहे. मुंबई मनपा भ्रष्टाचाराची लंका आहे, त्यात आम्ही उतरणार, असे म्हणत आता त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

रुग्णालयाला नोटीस देणं दुर्दैवी

माझे घर पाडले तर मला काही वाटणार नाही, मात्र रुग्णालयाला नोटीस देऊन त्यावर कारवाई का करता, असा सवाल रवी राणांनी राज्य सरकारला विचारला आहे. लीलावती रुग्णालयात शिवसेनेच्या नेत्यांनीही उपचार घेतले आहेत. याची आठवणही त्यांनी करून दिली. रुग्णालयाला नोटीस देणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत मुख्यमंत्र्यांच्या पदावर बसले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मोदींच्या नावाने मते घेतली आणि सत्ता दुसऱ्यासोबत उपभोगताय, अशी टीकाही राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

आधी उद्धव ठाकरेंनी तब्येतीचा रिपोर्ट द्यावा, मग मीही देते

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ठाकरेंच्या मुंबईतील सभेच्या दिवशी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. आम्ही घाबरणारे नाहीत तर लढा देणारे आहोत असे राणांनी म्हटले आहे. तर आम्ही चांगल्या हेतूने हनुमान चालिसा म्हणणार होतो. माझा रिपोर्ट मागण्याचा अधिकार शिवसेनेला कुणी दिला? उद्धव ठाकरे दोन वर्षे सभागृहात आले नाहीत, त्यासाठी त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. आधी त्यांचा रिपोर्ट द्यावा, मग मीही माझा रिपोर्ट देते, असे आव्हानच नवनीत राणांनी दिले.

14 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

मुंबईतील घराला मिळालेल्या नोटिशीला आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहोत. विचारधारा सोडलेल्या लोकांपासून राज्याला वाचवावे यासाठी आम्ही दिल्लीत हनुमानाची आरती करणार आहोत. 14 मेला राज्यात मुख्यमंत्री ठाकरेंची सभा आहे, त्याच दिवशी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत. आता जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 14 तारखेला भाषण करतील तेव्हा त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. तो म्हणजे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक लढणार का? लढणार तर कोणत्या मतदार संघातून? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असेही त्या म्हणाल्या.

शकुनी मामा ठाकरे सरकार डुबवणार

राज्यातील रामभक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना योग्य जागा दाखवतील, लवकरच आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सुलेमानसेना केली आहे. तर महाराष्ट्रातील शकुनी मामा उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार आहेत. असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...