आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबीती:नराधमांनी अंगावर एक कपडाही ठेवला नाही; रेप पीडिता म्हणाली - आई-वडिलांसह भावाला बेल्टने बेशुद्ध होईपर्यंत मारले

मनीष सोनी. राजगड (भोपाळ)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ते 8 जण होते. 3 बाहेर उभे होते, तर 5 जण घरात घुसले होते. त्यांनी कुटुंबीयांना मारहाण केली. माझ्या खोलीत आले...मला मारहाण केली. त्यांनी माझ्या अंगावर एक कापडही सोडले नाही. सर्व कपडे फाडले. बेदम मारहाण केल्यानंतर चौघांनी बलात्कार केला. मी विरोध केला, सोडण्याची विनवणी केली. ते मला बेल्टने मारायचे. 5वा माझ्याकडे निघाला... त्यानंतर काय झाले...माहिती नाही, कारण मी बेशुद्ध पडले होते. माझ्या पाठीवर बेल्टने मारलेल्या खुणा पाहून तुम्हाला त्यांच्या क्रूरतेचा पुरावा मिळेल.

अंगाचा थरकाप उडवणारी ही कथा 22 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेची आहे. राजगड येथील ही मुलगी सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. दिवस वेदनांत जातो. पण ही घटना आठवून ती झोपेतही भीतीने ओरडते...

दैनिक दिव्य मराठी नेटवर्कने पीडितेशी संवाद साधला असता, ती आपल्या व्यथा सांगताना ढसाढसा रडू लागली. रडतच तिने आपली आपबीती सांगितली...

रुग्णालयात उपचार सुरू असणारी पीडिता घटना आठवून थरथर कापू लागली. या स्थितीत तिची बहीण तिची काळजी घेत आहे.
रुग्णालयात उपचार सुरू असणारी पीडिता घटना आठवून थरथर कापू लागली. या स्थितीत तिची बहीण तिची काळजी घेत आहे.

आम्ही राजगडच्या करणवास पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात राहतो. कुटुंबात आई-वडील व आम्ही 6 भावंडं आहोत. 3 भाऊ व 3 बहिणी... काही वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाला 4 बिघा जमिनीचा सरकारी पट्टा मिळाला. ही जमीन आमच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. या शासकीय जमिनीवर गावातील गुंडांचे अवैध अतिक्रमण होते. ती आम्हाला मिळाल्यानंतरही त्यांची त्यावर नजर होती. संधी मिळताच ते भांडण करत. त्यांनी अनेकदा माझ्या वडिलांनाही मारहाण केली. जमीन सोडली नाही तर बघून घेऊ, अशी धमकी ते देत.

त्यांच्यापैकी एक अरविंद गुर्जर यांच्याशी आमचा वाद वाढला. 2 महिन्यांपूर्वी आम्ही अरविंद विरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी मारहाण व एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अरविंदला अटक केली. 4 मे रोजी अरविंदला जामिनासाठी न्यायालयात हजर केले जाणार होते. आम्हाला कळताच आम्ही पोलिस ठाणे गाठले. तिथे पोलिसांनी आम्हाला सांगितले की, तुमचा जामीनावर काही आक्षेप असेल तर तुम्ही न्यायालयात अर्ज करू शकता.

पीडितेने सांगितले की, पट्ट्यावर मिळालेल्या सरकारी जमिनीवरून आमचा आरोपींसोबत वाद सुरू आहे. ही जमीन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यापूर्वीही आम्हाला मारहाण केली.
पीडितेने सांगितले की, पट्ट्यावर मिळालेल्या सरकारी जमिनीवरून आमचा आरोपींसोबत वाद सुरू आहे. ही जमीन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यापूर्वीही आम्हाला मारहाण केली.

अरविंदने आमचे जगणे कठीण केले होते. या कारणास्तव मी व माझे वडील आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी न्यायालयात पोहोचलो. कोर्टात अरविंद,दीपक गुर्जर व आपल्या 10 सहकाऱ्यांसह आला होता. त्यांनी आम्हाला तडजोड करण्यास सांगितले. मी म्हणाले - आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. हे ऐकून अरविंद संतापून धमकावत म्हणाला - तुला शिक्षण जास्त झाले आहे. कुठे जाणार, गावातच राहणार ना? त्यावर मी म्हणाले- हो भाऊ, मी गावातच राहणार... आणखी कुठे जाणार. त्यानंतर ते आम्हाला शिवीगाळ करत निघून गेले. आम्ही कोर्टातून थेट गावी परतलो. दुसरीकडे अरविंदला कोर्टात जामीन मिळाला.

गुरुवारी सायंकाळी म्हणजे 4 मे रोजी माझे आई-वडील व चुलत भाऊ घरी होते. मी माझ्या खोलीत होते. रात्री 10च्या सुमारास कुणीतरी दरवाजा ठोठावला. वडील बाहेर आले तेव्हा अरविंद गुर्जर, दीपक गुर्जर, नागेंद्र गुर्जर, राकेश गुर्जर, मेहेरबान, बनवारी, रामेश्वर व अन्य 1 जण उभा होता. दरवाजा उघडताच 5 जण आत शिरले. 3 जण बाहेर उभे होते. ते वडिलांना म्हणाले - तुझी मुलगी कुठे आहे? खूप वकील बनत आहे. काही बोलण्यापूर्वीच त्यांनी माझ्या वडिलांना क्रशर मशीनच्या बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही त्यांनी बेल्टचा वर्षाव केला. माझा चुलत भाऊ वाचवण्यासाठी धावला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. सर्वांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाली. भावाची पाठ फुटून निघाली. वडिलांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आरोपींनी क्रशर मशीनच्या बेल्टने संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली.
आरोपींनी क्रशर मशीनच्या बेल्टने संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली.

या गुंडांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मी खोलीतून बाहेर पडत नव्हते. माझा फोन बाहेर चार्जिंगवर होता. मी व दीदी पोलिसांना फोन करण्यासाठी फोन आणण्यासाठी आलो. तेव्हा त्यांनी घरातील वीज बंद केली. मला पाहून ते पुढे सरकले. मी खोलीच्या दिशेने धावले. पण त्यांनी मला पकडून फोन घेतला. जमिनीवर आपटला. मी कशीतरी सुटका करून खोलीच्या दिशेने धावले. आतून दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला. पण एका आरोपीने दारावर लाथ मारली. त्यामुळे मी खाली पडले. ते 5 ही जण खोलीत शिरले. त्यांनी अत्यंत निर्दयीपणे माझे सर्व कपडे फाडले. मला मारहाण करून आळीपाळीने बलात्कार केला.

रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या पीडितेच्या वडिलांनी सांगितले- मी माझ्या मुलीला सोडण्याची याचना केली. पण त्यांनी माझे काहीएक ऐकले नाही.
रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या पीडितेच्या वडिलांनी सांगितले- मी माझ्या मुलीला सोडण्याची याचना केली. पण त्यांनी माझे काहीएक ऐकले नाही.

यापूर्वी 28 डिसेंबर 2022 रोजीही आमच्यात वाद झाला होता. आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचलो, तेव्हा पोलिसांनी साधी तक्रारही नोंदवली नाही. ते म्हणाले की, तुम्ही खोटे आरोप करत आहात. अर्ज घेऊन घरी पाठवले. आम्ही सीएम हेल्पलाइनकडे तक्रार केली. त्यानंतरच आमची तक्रार दाखल झाली. 15 दिवसांपूर्वी मी पटवारी भरतीसाठी भोपाळला गेले होते. अरविंद गुर्जरने वडिलांना एकटे गाठून मारहाण केली. यापूर्वीही असे दोनदा घडले. या लोकांनी आमचे जगणे मुश्किल केले आहे. मी जाईन तिथे ते माझा पाठलाग करतात. घाणेरड्या कमेंट करतात. माझे बी.कॉम पूर्ण झाले. मी M.Com ची तयारी करत होते. पण त्यांच्या या त्रासाला कंटाळून मी माझे शिक्षण अर्ध्यावरच थांबवले.

प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींचा दबाव

पीडितेचे वडीलही जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी सांगितले- मारहाणीच्या प्रकरणात आरोपी आमच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. 4 मे रोजी अरविंद व दीपकने त्यांच्या मित्रांसह मला व माझ्या कुटुंबीयांना बेल्टने मारहाण केली. माझ्या मुलीला मारहाण केल्यानंतर तिचे कपडे फाडले. मी विनवणी केली. त्यांनी ऐकले नाही. माझा गळा दाबला. बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. यापूर्वीही त्यांनी आम्हाला 3-4 वेळा मारहाण केली. माझा एक हात मोडला. पोलिस आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करत नाहीत. मी जातो तिथे माझा पाठलाग केला जातो.

पीडित कुटुंबीयांच्या मते, आरोपींनी यापूर्वीही त्यांच्यावर हल्ला केला. पण पोलिसांनी आमच्या तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही.
पीडित कुटुंबीयांच्या मते, आरोपींनी यापूर्वीही त्यांच्यावर हल्ला केला. पण पोलिसांनी आमच्या तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही.

संपूर्ण कुटुंबाला मारहाण

हे प्रकरण राजगढ जिल्ह्यातील करनवास पोलिस ठाण्याशी संबंधित आहे. येथील एका गावात 4 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास एका 22 वर्षीय दलित मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. गावातीलच 8 गुंड पीडितेच्या घरी पोहोचले. 3 बाहेर होते, तर 5 जण घरात शिरले. शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना क्रशर मशीनच्या बेल्टने मारहाण केली. वडिलांच्या व माझ्या चुलत भावाच्या पाठीला एवढा जबर मार लागला की, त्यांची त्वचा सोलून निघाली. ते बेशुद्ध झाल्यानंतर 5 ही जण पीडितेच्या खोलीत घुसले. त्यांनी मुलीला पकडून तिचे कपडे फाडले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

करनवास पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यादव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच ते स्वतः घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे.
करनवास पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यादव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच ते स्वतः घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे.

7 आरोपींना अटक, एकाचा शोध सुरू

करनवास पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यादव यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाचा अरविंद गुर्जर यांच्याशी घरासमोर हातपंपासाठी खड्डा खोदण्यावरून वाद सुरू होता. गुरुवारी रात्री काही जणांनी या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची माहिती मिळाली. आरोपींनी त्यांच्या मुलीचे कपडेही फाडले. मी टीमसोबत घटनास्थळी पोहोचलो. पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ 5 आरोपींविरुद्ध कलम 147, 149, 456, 354, 294, 323, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच अरविंद, मेहेरबान, दीपक व बनवारी यांना अटक करण्यात आली. दुसरा आरोपी फरार झाला.

शुक्रवारी रात्री पीडितेवर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. शनिवारी सकाळी बियारा कोर्टात जबाब नोंदवण्यात आला. पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे आणखी 3 जणांना कलम 376 डी अंतर्गत आरोपी करण्यात आले. नागेंद्र, राकेश व रामेश्वर या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, 1 जण फरार आहे.