आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Year Too, Cold Will Not Be Felt... Day night Mercury Will Be Normal Or More

दक्षिणेकडील राज्यात तापमानात वेगाने घट होण्याची शक्यता:यंदाही जाणवणार नाही थंडी; दिवस-रात्रीचा पारा सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण भारतातील ५ राज्ये वगळता संपूर्ण देशात लागोपाठ दुसऱ्या वर्षी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता नाही. भारतीय हवामान विभागानुसार पुढील तीन महिन्यांत (डिसेंबर ते फेब्रुवारी २०२३) देशामध्ये सरासरी तापमान सामान्य राहील किंवा त्यापेक्षा थोडे जास्तही राहू शकते. म्हणजेच पारा फारसा घसरणार नाही.

डोंगराळ राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरेतील मैदानी राज्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी जास्त राहणार नाही. तसेच मध्य, पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांत कमाल (दिवसा) व किमान (रात्री) तापमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. तथापि, उत्तर भारतात काही ठिकाणी पुढील तीन महिन्यांत कधी कधी एक वा दोन दिवस पारा जास्त घसरेल. यामुळे या वर्षी ‘कोल्ड डे’ आणि ‘सिव्हियर कोल्ड डे’ची संख्या गत वर्षांच्या तुलनेत कमी राहील. तथापि, देशाच्या दक्षिणेकडील राज्यांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सरासरीपेक्षा ३१% अधिक पावसाची शक्यता आहे. धुक्यामुळे १८ रेल्वेगाड्या ३ महिन्यांसाठी रद्द... उत्तरेत धुक्यामुळे १८ रेल्वेगाड्या ३ महिन्यांसाठी रद्द केल्या आहेत. पैकी बहुतांश लांब पल्ल्याच्या आहेत. उत्तर-मध्य रेल्वेच्या २६ फेऱ्या कमी केल्या आहेत.

हे आहे कारण... पश्चिमी विक्षोभ कमी येतील, बंगालच्या उपसागरातील पूर्वेकडील हवेमुळे जास्त वाढणार नाही पारा भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, यंदा हिवाळ्यात पश्चिमी विक्षोभ कमी संख्येने येऊ शकतात. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील हवा लागोपाठ येत राहील. यामुळे ढगाळ वातावरण कमी राहील व या हालचालींच्या परिणामाने उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील. हा तीन महिन्यांचा सरासरी अंदाज आहे. तथापि, तापमानात दैनंदिन आधारे बदल होत राहतात.

नोव्हेंबरमध्ये रात्रीच्या वेळी थंडी
नोव्हेंबरमध्ये उत्तर-पश्चिमेकडील डोंगराळ ते मैदानी राज्यांपर्यंत रात्रीचे तापमान (किमान) सरासरीपेक्षा कमी होते. तर दिवसा आकाश निरभ्र राहिल्याने तापमान (कमाल) सरासरीपेक्षा जास्त होते. यामुळे लोकांना थंडी जाणवली नाही. नोव्हेंबरमध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानात खूप जास्त फरक असल्याचे हे लागोपाठ दुसरे वर्ष आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, पुढच्या वर्षीही असेच राहिले तर थंडीच्या पॅटर्नमध्ये बदल झाला, असे म्हटले जाऊ शकते.

महाराष्ट्रात किमान अन् कमाल तापमानात चढउतार
नाशिक उत्तर भारताकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तर विदर्भात किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सियसच्या आत असल्याने नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी औरंगाबादेत नीचांकी १०.८ अंश सेल्सियसची नोंद झाली. आगामी ३-४ दिवस किमान व कमाल तापमानात चढउतार कायम राहील. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा अंदाज असून रविवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...