आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत बंद:दिल्लीला घेरले, अन्नदात्याचे आज देशभर शक्तिप्रदर्शन; 11 ते 3 वाजेपर्यंतच चक्का जाम, महाराष्ट्रात कुठे काय बंद

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र : ग्रामीणमध्ये एसटी बंद, सीए फाउंडेशनचा पेपर लांबणीवर

शेतकऱ्यांनी राजधानीला चोहोबाजूंनी घेरले आहे. बॉर्डरहून २० किमी मुरथलपर्यंत ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या असून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चक्का जाम केला जाईल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले. काँग्रेससह २० पक्षांनी बंदला पाठिंबा दिला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आग्रा मेट्रोच्या पायाभरणीवेळी सांगितले की, ‘मागील शतकातील कायदे पुढील शतकासाठी अोझे ठरतात. यामुळे सुधारणांची प्रक्रिया सातत्याने चालत राहिली पाहिजे.’

महाराष्ट्र : ग्रामीणमध्ये एसटी बंद, सीए फाउंडेशनचा पेपर लांबणीवर भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ग्रामीण भागात एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रात कुठे काय बंद
1.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. या वेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद राहील. माथाडी कामगारही काम बंद ठेवणार आहेत.
2. राज्यातील ४ लाख बँक कर्मचारी बिल्ला परिधान करून जनतेला संदेश देतील, असे संघटनेचे देविदास तुळजापूरकर म्हणाले.
3. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने पाठिंबा दिला. त्यामुळे विभागातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद असतील.
4. चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन या परीक्षेचा पेपर-१ आता १३ डिसेंबरला होईल. मात्र यासाठी जुनेच परीक्षा प्रवेशपत्र ग्राह्य असेल.

पुरस्कार वापसी करताना यांना रोखले : - पद्मश्री कर्तार सिंह, माजी आयजी, कुस्ती - अजितपाल, द्रोणाचार्य विजेते, हॉकी - राजबीर कौर, अर्जुन विजेते, हॉकी - गुरमेल सिंह, ध्यानचंद विजेते, हॉकी - कौर सिंह, अर्जुन विजेते.

प्रशासनाने रस्तेच अडवले, २० किमी पायपिटीनंतर पोहोचला महिलांचा चमू
एम. रियाझ हाशमी | सिंघू आणि टिकरी सीमेहून

पहाटेचे ५.३० वाजले आहेत. सिंघू सीमेवर ज्येष्ठ, तरुण, किशोर, मुले आणि महिला सर्व जण आंदोलनात आपापली जबाबदारी पूर्ण करण्यात गुंतले आहेत. जे आंदोलनात रात्रभर जागत होते, ते आता तात्पुरते तंबू आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींतील बिछान्यांवर झोपत आहेत. महाग एसयूव्ही गाड्यांत हरियाणा आणि पंजाबच्या शेतकरी कुटुंबातील युवक दूध, फळे, भाज्या, औषधे आणि रेशन घेऊन येत आहेत. नजर पोहोचते तिथपर्यंत रस्त्यांवर शेतकऱ्यांचा मेळा आणि दिवस-रात्र सुरू असणारे लंगर दिसत आहेत. आरसीसीचे पाचस्तरीय बोल्डर, त्यासमोर लोखंडी बॅरिकेड आणि त्यावर काटेरी कुंपण टाकून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशापासून रोखले आहे. त्याच्या अगदी मागे धरणे आंदोलनस्थळ आहे. त्यापलीकडेही अशाच अडथळ्यांद्वारे सुमारे ५०० मीटरमध्ये मर्यादित केले होते. पण त्यापलीकडे शेतकऱ्यांचा मोठा डेरा आहे आणि त्यात हरियाणा व पंजाबमधून दररोज येणाऱ्या शेतकऱ्यांची भर पडत आहे.

एकीकडे प्रशासन प्रवेशाचे मार्ग अरुंद करण्यात गुंतले आहे, तर दुसरीकडे नवांशहरच्या जसपाल कौर सांगतात, ‘सिंघू सीमेपासून २० किमीवरील मुरथलपर्यंत शेतकऱ्यांचा जमाव पोहोचला आहे. पहाटे ५ वाजता मुरथल येथून पायी चालत सिंघू सीमेपर्यंत पोहोचले आहे.’ सिंघू सीमेकडील बाजूकडे सभा सुरू आहे, तिला हजारो शेतकरी हजर आहेत. फतेहगड साहेब येथील बी. टेक. झालेला रमणप्रीतसिंह सांगतोय की, माझे वडील दिलबागसिंग टिकरी सीमेवर आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. शेतकरी मजूर संघर्ष समितीचे पंजाब राज्याचे संघटन सचिव सुखविंदरसिंह सबराह (तरणतारण) म्हणाले की, ‘तिन्ही कायद्यांत ३४ त्रुटी असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे. आम्हाला दुरुस्त्या नकोत, तर हे कायदेच मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे.’ दिल्ली-रोहतक मार्गावरील टिकरी सीमेवरही असेच दृश्य आहे. मंचाच्या बाजूला बसलेल्या सुखविंदर कौर वर्गणी गोळा करत आहेत. त्या पंजाबच्या मानसा येथील असून भारतीय किसान युनियन उग्राहांच्या उपाध्यक्ष आहेत. आंदोलनात कोणत्या गावातून किती लोक, कोणत्या वाहनाने आले आणि कोणी केव्हा काय योगदान दिले, खर्च किती झाला, याचे सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. भाकियू उग्राहांशी संबंधित १४०० गावे आहेत, ती वर्षात दोन वेळा गहू आणि धान ही पिके हाती आल्यानंतर वर्गणी देतात.

भाकियू उग्राहांशी संबंधित १० हजारपेक्षा जास्त शेतकरी येथे वाहनांसह रस्त्यांवर बसले आहेत. दरम्यान, काही स्वयंसेवक गावरान तुपातील जिलबी, शिरा आणि चहा वाटप करत पुढे जातात. एक स्वयंसेवक सुखबीरसिंग सिक्का यांनी सांगितले की, हरियाणातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा गट जिलबी आणि शिरा तयार करत आहे. हरियाणाच्या हिसार येथून आलेले पशुपालक सुखविंदर ढांडा आपल्या म्हशींमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी विकसित केलेली म्हैस ५१ लाख रुपयांत विकली होती. ते म्हणाले की, शेतीशिवाय पशुपालनाद्वारेही शेतकरी कमाई करतात. त्यामुळे त्यांच्या फंडिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. महाग कार, मोबाइल आणि जीन्स-टी शर्टचा शौक शेतकरी का पूर्ण करू शकत नाहीत? पंजाबच्या भटिंडा येथून आलेल्या हरिंदरबिंद कौर कारद्वारे संपूर्ण रस्त्यावरील व्यवस्थांची पाहणी करत काही वेळानंतर निदर्शनांत सहभागी होतात. त्यांचे वडील मेघराज भक्तुआना यांना ३० वर्षांपूर्वी खलिस्तान समर्थकांनी ठार केले होते. आता त्या भाकियू उग्राहंच्या सचिव आहेत आणि पंजाबच्या महिलांना आंदोलनाशी जोडण्याची भूमिका पार पाडत आहेत. मंचच्या बाजूला बसलेल्या जसबीर कौर नत कारकून पदावरून निवृत्त झाल्यानंतर किसान युनियनशी जोडल्या गेल्या, त्यांचा मुलगा सिंघू सीमेवर धरणे देत आहे. येथे गुरमेल कौर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ महिला आहेत, त्या कुठल्याही संघटनेशी जोडलेल्या नाहीत, पण आंदोलकांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातून आल्या आहेत.

पोलिसांवर विश्वास नाही, रात्री महिला सुरक्षेची जबाबदारी निहंग बांधवांवर
मनीषा भल्ला | सिंघू बॉर्डरवरून

रात्र जसजशी वाढतेय तसे धुकेही दाट होत चाललेय. ट्रॉलीजच्या ताडपत्र्यांना हात लावला तर त्या आेल्या झालेल्या. अशा कडाक्याच्या थंडीतही अनोळखी माणसे, युवक ठिय्या देऊन आहेत. सर्वत्र दाट अंधकार असल्याने सुरक्षेचीही काळजी वाटतेय. परंतु महिलांसाठी या ठिकाणची रात्र इतकी शांत आणि सुरक्षित आहे की कोणत्याही आंदोलन, रॅली अथवा प्रशासनासाठी तो आदर्श वस्तुपाठ ठरावा.
घनदाट काळोखात महिला कोणत्या परिस्थितीत आहेत हे पाहण्यासाठी रात्री उशिरा सिंघू बॉर्डरहून सोनिपतकडे पायी चालत गेले. रात्री फिरताना पाहून निहंग शीख बांधव म्हणाले, रात्री फिरू नका. झोपायला जा. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की, दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर सुरक्षेची जबाबदारी निहंग शीख बांधवांवर आहे. ते आपले घोडे आणि शस्त्रास्त्रांसह इथे आले आहेत. निहंग शीख रात्रभर इथे आळीपाळीने पहारा देतात. इथे एखादी अनुचित घटना तर सोडाच; पण वाईट हेतूने फिरूही शकत नाही, असे बटाला येथील बाबा बकाला यांनी सांगितले. दाट अंधारात एवढ्या लांबच्या लांब मार्गावर पोलिस अथवा त्यांच्या गाड्या दिसून आल्या नाहीत.

दोन्ही सीमांवर दिवसभर निहंग शीख बांधव शस्त्रांसह पहारा देतात. आमचा एक शीख लाख-सव्वा लाखाच्या फौजेइतका समर्थ आहे. त्यामुळेच सरकारी सुरक्षेची गरजच नाही. निहंग शीख घोड्यांना भाईजान म्हणतात. दिवसातून एकदा ते भाईजानसोबत गस्त घालतात. सर्व शेतकरी आपापल्या टेम्पो, ट्रॉलीजमध्ये निद्राधीन झाले आहेत. अगदी आपल्या घराप्रमाणेच इथे सर्वत्र चिडीचूप शांतता आहे.महिला तर सायंकाळी ५ वाजता आपल्या जागी पोहोचतात.

प्रत्येक ट्रॉलीजवळ रात्री १० वाजेपर्यंत लंगरची व्यवस्था असते. मोठे लंगर तर दिवसरात्र अखंड सुरू असतात. बदामाचे गरमागरम दूध घेऊन युवकांचे जथ्थे रात्री फिरत असतात. िदल्लीच्या सिंघू बॉर्डरवरून पानिपतच्या रस्त्यावर सुमारे २० किमी पसरलेल्या या आंदोलनस्थळाचे रूपांतर आता कायमस्वरूपी तळामध्ये झाले आहे. छाजलीहून आलेल्या १५ वयस्कर महिला टीडीआय मॉलच्या कॉरिडॉरमध्येच झोपतात. त्या ठिकाणी गावातील युवक त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात. अगदी त्यांना टॉयलेटला घेऊन जाण्याचीही जबाबदारीही या तरुणांवर असते. पंजाब जनवादी स्त्री सभेच्या तीन ट्रॉलीज भरून फक्त महिलाच आलेल्या आहेत. त्यांचे नेतृत्व करणारी नीलम घुम्मन इतर महिलांसमवेत मटार निवडण्याचे काम करीत होती. ती म्हणाली, राजकीय नेत्यांनी पंजाबच्या तरुणाईला नशेत ढकलले होते. शेतकरी आंदोलनामुळे ही तरुणाई पुन्हा मुख्य प्रवाहात आली आहे. आजूबाजूला नजर टाका, तरुण शेतकऱ्यांच्या किती ट्रॉलीज आहेत. आमचे युवक आता समजूतदार झाले आहेत. आमच्या कारच्या दिशेने जाताना सुखपाल कौर यांच्याशी गप्पा मारल्या. एका पेट्रोल पंपावर आपल्या मैत्रिणीसोबत त्या टॉयलेटसाठी आल्या होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही सगळ्या अशिक्षित आहोत. पण कृषी कायद्यांबाबत आम्हाला सर्व माहिती आहे. कारण आपली भूक सर्वांना कळते. यानंतर मी आपल्या कारमध्ये झोपण्यासाठी निघून गेले. पहाटे ४ वाजता गुरुबाणी आणि भजनानेच मला जाग आली. प्रत्येक पाच पावलांवर चहापाणी, बिस्कीट मिळते. लोक पेट्रोल पंपावर अंघोळ करीत होते. पाण्याच्या टाक्या हरियाणाहून आल्या आहेत. गरमागरम पुरी आणि छोले तयार होत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser