आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:आज जगात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी होईल...दिलासा एवढाच की यातील 54% रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातही 5 लाख रुग्ण, 2.95 लाख पूर्ण बरे झाले

जगात कोरोनाबाधितांची संख्या १ कोटींच्या जवळ पोहोचली आहे. शुक्रवारी १,८०,५७३ नव्या रुग्णांसह ही संख्या ९८,०९,०६४ झाली होती. प्रसाराचा हा वेग असाच कायम राहिला तर शनिवारी कोरोनाची रुग्णसंख्या १ कोटींच्या पुढे जाईल. कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. नंतर ७ महिन्यांत कोरोना जगातील सहा खंडांत २१५ देशांत पोहोचला. यात दिलासादायक बाब ही की, एक वेळ प्रचंड भय निर्माण केलेला कोरोना मानवी इच्छाशक्तीसमोर पराभूत होत आहे. संसर्ग सातत्याने वाढूनही जगातील ५४% रुग्ण बरे झाले. मृत्युदरही केवळ ५% आहे. भारतातही रिकव्हरी रेट ५९% पर्यंत पोहोचला आहे.

रोजचे मृत्यू घटले, रुग्णालयात भरती होणारेही कमी

जगभरात रोज काेरोनामुळे ४५९९ मृत्यू होताहेत. एप्रिलमध्ये हा आकडा ६ हजारांपेक्षा जास्त होता. मार्चमध्ये रुग्णालयात दाखल रुग्णांचा मृत्युदर २१% होता. तो घटून १० % झाला आहे. अमेरिकी तज्ज्ञांनी दावा केला होता की, संसर्ग वाढला तरी बळींची संख्या घटत असल्याने व्हायरसचे म्युटेशन कमकुवत होत आहे. मात्र डब्ल्यूएचओने हा दावा फेटाळून लावला आहे.

- चीनने अंधारात ठेवले: चीनने जगाला पहिला रुग्ण डिसेंबरच्या अखेरीस सांगितला. तथापि, कोरोनाचे रुग्ण जुलै-ऑगस्टमध्येच दिसू लागले होते, असा गौप्यस्फोट तेथील तज्ज्ञांनी केला होता.

- अमेरिकेत आवरता आवरेना: सर्वाधिक १.२५ लाख बळी गेलेल्या अमेरिकेत रोज ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

- ब्रिटनला उशिरा जाग: ३ लाख रुग्ण व ४३ हजार मृत्यू झालेल्या ब्रिटनने उशिरा पावले उचलली. सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, नंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच लॉकडाऊन करावे लागले.

- युरोपात पुन्हा रुग्णवाढ: युरोपात कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. या आठवड्यात महिन्यात प्रथमच रुग्ण वाढले. २० हजार रुग्ण रोज वाढत आहेत आणि ७०० मृत्यू होत आहेत.

- ब्राझीलमध्ये ४ महिन्यांत ५५ हजार मृत्यू: ब्राझीलमध्ये गेल्या ४ महिन्यांत ५५ हजार मृत्यू झाले.अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानी.

- आयुष्य वाचवण्यासाठी जगाने शिकले दोन नियम- मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग

२६ दिवसांत देशात ३ लाख बाधित वाढले; महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण

भारतात रुग्णसंख्या ५ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. शुक्रवारी १८,६६१ नव्या रुग्णांसह देशातील रुग्णांचा आकडा ४,९९,७२९ झाला. ३० जानेवारीला केरळात पहिला रुग्ण आढळला होता. तथापि, देशात रिकव्हरी रेट वेगाने वाढत आहे. एकूण २,९५,१८६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोना संसर्गाने जूनमध्ये वेग वाढवला आहे. १ जूनला देशात १,९२,१७२ रुग्ण होते. म्हणजे, जूनच्या २६ दिवसांत ३,०७,५५७ रुग्ण वाढले. मात्र, गेल्या महिनाभरात रिकव्हरी रेटही १६% वाढला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १,५२,७६५ रुग्ण आहेत.

- तेलंगण, आंध्र प्रदेश व हरियाणात महिनाभरात रिकव्हरी रेट वाढण्याऐवजी घटला आहे. तेलंगणमध्ये २३.२४, आंध्रात १८.५७ आणि हरियाणात ०.९३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

- सर्वाधिक संसर्गाच्या १० राज्यांपैकी गुजरातेत सर्वाधिक ५.८८% मृत्युदर आहे, तर तामिळनाडूत सर्वात कमी.

- सर्वाधिक लाेकसंख्येच्या उत्तर प्रदेश, िबहार व पश्चिम बंगालपैकी यूपीत आठवडाभरात ४% वेगाने रुग्ण वाढले. इतर दोन्ही जागी दर ३% होता.

- प्रती १० लाख लोकसंख्येमागे रुग्णांच्या हिशेबाने दिल्लीत सर्वात जास्त रुग्ण आहेत.

अर्थव्यवस्था : भारतासह १०७ देशांतील आर्थिक सुधारणांसाठी ५०० लाख कोटींचे पॅकेजकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात दीर्घकाळ लॉकडाऊन सुरू होते. कोरोनाची लागण होण्याआधी आयएफने जागतिक जीडीपी ३.३% वाढीचा अंदाज वर्तवला होता. ही वाढ आता -3% अपेक्षित आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी १०७ देशांनी ५०० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेेज दिले आहे. अमेरिकेने १४० लाख कोटी, तर भारताने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

लस : जगभरात कोरोनाच्या १२० लसींवर संशोधन सुरू, ४ वरील काम अंतिम टप्प्यातकोरोनाला हरवण्यासाठी जगभरात सुमारे १२० लसींवर संशोधन सुरू आहे. ४ लसी अंतिम टप्प्यात आहेत. एक अमेरिकेत, दोन ब्रिटनमध्ये आणि एक चीनमध्ये तयार होत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेजनेका कंपनीच्या एझेडडी १२२२ या लसीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावर युरोपमधील अनेक देश एकत्र काम करत आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यांत ही लस यशस्वी ठरली असून ८०० रुग्णांवर तिची चाचणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...