आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा..अखेर टीम इंडिया टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाद झाली. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला. IPL मध्ये धडाकेबाज खेळी करणारे भारतीय स्टार या सामन्यात पूर्णतः निस्तेज दिसून आले. चला तर मग टीम इंडियाच्या पराभवाची पटकथा लिहिणारे 5 फॅक्टर पाहुया...
मोठ्या सामन्यात राहुल पुन्हा फ्लॉप
मोठे सामने व मोठ्या संघाविरोधात भारतीय ओपनर केएल राहुल ढेपाळण्याची परंपरा या सामन्यातही कायम राहिली. बांगलादेश व झिम्बाब्वेविरोधात राहुने अर्धशतक ठोकले. या सामन्यातही त्याने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. पण त्याचा खास फायदा झाला नाही. तो 5 चेंडूंत 5 धावा करून क्रिस व्होक्सच्या चेंडूवर बटलरच्या हातात झेल सोपवून तंबूत परतला.
पॉवर-प्लेमध्ये टुक-टुक...
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपण टॉस जिंकली असती तर प्रथम फलंदाजीच घेतली असती असे मत व्यक्त केले. त्याची इच्छा पूर्ण झाली. पण भारतीय फलंदाजांचा खेळ पाहता ते सर्वचजण दबावाखाली असल्याचे दिसून आले. पॉवर-प्लेच्या 6 षटकांत भारताने 1 गडी गमावून केवळ 38 धावा केल्या होत्या. 10 षटकांत भारताने केवळ 62 धावा केल्या होत्या.
हार्दिकशिवया कुणीही चालला नाही
संथ सुरुवातीनंतर भारताच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये पॉवर हिटिंगची गरज होती. हार्दिक पंड्याने ही गरज पूर्ण केली. पण त्याला इतर कुणीही साथ दिली नाही. हार्दिकने 190 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. पण किमान 15 चेंडू खेळणारा इतर कोणत्याही फलंदाजाला 130 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करता आली नाही. कर्णधार रोहित शर्माने 96, तर कोहलीने 125 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. सूर्याने चांगली सुरुवात केली. पण तो 10 चेंडू खेळून बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही 4 चेंडूंत 6 धावा करून तंबूत परतला.
गोलंदाजीला नव्हती धार अन् दिशा
भारताने या विश्वचषकात सेमीफायनलपूर्वीच्या सर्वच सामन्यांत चांगली गोलंदाजी केली. आपल्या वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंगही मिळत होता. पण या सामन्यात स्विंग दिसला नाही. परिणामी, भारतीय गोलंदाज पूर्णतः निष्प्रभ दिसून आले. भुवनेश्वर व अर्शदीपच नव्हे तर शमीही निस्तेज अन् ढेपाळलेले दिसून आले. आपल्या बॉलिंग यूनिटला इंग्लंडच्या फलंदांजांचे बळी टिपणे तर दूर साधा त्यांना त्रासही देता आला नाही.
बटलर-हेल्सची धडाकेबाज फलंदाजी
169 धावांचे टार्गेट सेमीफायनलसारख्या सामन्यात आव्हानकारक ठरले असते. पण इंग्लिश ओपनर्स जोस बटलर व एलेक्स हेल्सने कोणताही दबाव घेतला नाही. दोघांनी पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर फेकले. बटलरने 163 च्या स्ट्राइक रेटने 80, तर हेल्सने 182 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 86 धावा केल्या. थक्क करणारी गोष्ट म्हणजे आपल्या एकाही गोलंदाजाला एकही विकेट घेता आला नाही. इंग्लंड 10 विकेट्सने जिंकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.