आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:देवी-देवतांना मानणारे आदिवासी आक्रमक; ख्रिश्चन झालेल्यांच्या कबरी खोदल्या जाताहेत

यशवंत गोहिल | कोंडागाव, नारायणपूर (छत्तीसगड)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्तीसगडच्या बस्तरमध्ये धर्मांतरामुळे होणारा हिंसाचार आता नवे आव्हान

बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणात दोन आदिवासी गट आहेत. एक देवी-देवतांना मानणारा, तर दुसरा चर्चमध्ये जाणारा. दोन्ही गटांत संघर्ष सुरू आहे. स्थिती इतकी बिकट आहे की, ज्यांनी पूर्वी धर्मांतर केले त्यांचे मृतदेह गावांमध्ये दफन करण्यास मज्जाव केला जात आहे. दफन केलेच तर कबरी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वेगाने वाढलेल्या धर्मांतरामुळे आपली संस्कृती नष्ट होईल, अशी भीती आदिवासींना आहे. त्यामुळेच धर्मांतर केलेल्या लोकांना गावाबाहेर केले जात आहे. अविश्वास इतका वाढला आहे की, प्रसारमाध्यमे व पोलिसांसोबतही सातत्याने झटापट होत आहे. यात नारायणपूरच्या पोलिस अधीक्षकांचे डोके फोडण्यात आले. कोंडागावच्या चार चर्चमध्ये २५० लोकांना आश्रय दिला आहे. बाजारपाराच्या चर्चमध्ये ३० कुटुंबे आहेत. मेटोडिड चर्चमध्ये ७० लोक आहेत. भाड्याच्या घरांमध्येही निर्वासित आहेत.

घर गेले, जमीनही गेली; मुलांमध्ये पसरवला द्वेष
मुले शिकत होती, आता शाळेत जाणे बंद आहे : बांसगावच्या सहदेवी सांगतात, मला दोन मुले आहेत. राजकुमार व सविता. कुटुंब २०१९ पासून चर्चमध्ये जात आहे. यामुळे गावच्या आदिवासींनी कुटुंबाशी नाते तोडले. नुकताच १८ डिसेंबरला ग्रामस्थांनी घरावर हल्ला केला. सर्वकाही मागे सोडून कोंडागावात यावे लागले. दोन्ही मुले शिक्षणापासून वंचित झाली आहेत. आमच्या गायी, बैल, बकऱ्या सर्वकाही हिरावले.

पाणी बंद केले : किवाईबालेंग येथील ३५ वर्षांच्या रामवती सांगतात, त्रास होता म्हणून चर्चमध्ये गेलो. इथे दिलासा मिळाला. मग रोजच जायला लागले. तिथे गेल्याने ग्रामस्थांनी आमचे पाणी बंद केले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आम्ही त्यांच्यासोबत राहण्याच्या लायकीचे नाही. गावाचा प्रमुख पिलाराम मारहाण करून पळाला, असा रामवतींचा आरोप आहे.

मुलांना खेळूही देत नाहीत : बांसगावची सीमा ११ वर्षांची आहे. गळ्यात क्रॉस घालते. सहावीत शिकते. आधी सीमासोबत शाळेत मुले खेळत होती. दोन वर्षांपासून चर्चमध्ये जात असल्याने इतर मुलांनीही तिच्यासोबत खेळणे बंद केले आहे. १८ डिसेंबरच्या संघर्षानंतर तर शाळेत जाणेही बंद झाले आहे. पिंकी नेताम, रेशमा नेताम, अंकिता मंडावी आदी सर्वांची हीच कहाणी आहे.

{गावासोबतचे असलेले ४५ वर्षांचे नाते तोडले : ६० वर्षांच्या बुधन सांगतात, १५ वर्षांची असताना लग्न झाले. तेव्हापासून गावात राहत होते. ४५ वर्षांपर्यंत सर्वांसोबत चांगले संबंध होते. ४ वर्षांपासून चर्चमध्ये जात आहे, म्हणून सर्वांनी नाते तोडले. त्या म्हणतात, महेश माझ्या कुटुंबातीलच आहे. त्याने जमीन, शेती सर्वकाही हिसकावले. म्हणाला, जिथे जायचे तिथे जा.

आदिवासींची बाजू
... आता गावागावात चर्च, परंपरा धोक्यात

नारायणपूरच्या गरांजी गावचे पटेल सीताराम म्हणतात, नारायणपूर ८४ परगण्यात विभागले होते. हे लोक (ख्रिश्चन) वेगाने गावागावात पसरत आहेत. यामुळे आमची परंपरा धोक्यात येऊ शकते. आधी देव उचलण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची, आज बोलवावे लागते. आदिवासी समाज हिंसक नाही, तर संघटित आहे व आपल्या परंपरा त्यांना सर्वात प्रिय आहेत. अशा वे‌ळी आमची संस्कृती नष्ट करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणारच. आमच्या जमिनीवर बिगर आदिवासीला दफन केले तर जमीन प्रदूषित होईल, देवता नाराज होतील, असे आदिवासींना वाटते. आधी तालुका पातळीवर चर्च होते. मात्र, आता ग्रामपंचायत पातळीवर चर्च उघडले जात आहेत. चर्चला जाणाऱ्या लोकांत एका बाबतीत साम्य आहे. ते म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या आजाराचा ते सामना करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...