आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:उत्सवात तृणमूलची आघाडी, आता भाजपच्या नेताजी जयंतीकडे लक्ष

काेलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकातामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेताना ममता बॅनर्जी. - Divya Marathi
कोलकातामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेताना ममता बॅनर्जी.
  • भाजपवर टीका करणाऱ्या ममतादीदी माेदींसमवेत एकाच मंचावर येणार

पश्चिम बंगालमध्ये उत्सव लाेकसंस्कृतीचा भाग आहे. टागाेर जयंती, विवेकानंद जयंती किंवा नेताजी सुभाषचंद्र यांचा जन्मदिन असाे, राज्यात यानिमित्ताने सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयाेजित केले जातात. या कार्यक्रमाच्या समित्यांमध्ये स्थानिक राजकारणदेखील दिसून येते. परंतु यंदा राजकारणाची कक्षा दिल्लीपर्यंत पाेहाेचल्याचे दिसून आले.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व केंद्रातील सत्ताधारी भाजप यांच्यात सामाजिक-सांस्कृतिक पातळीवर ‘बंगाली मानुष’ला आकर्षित करण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली दिसते. गेल्या वर्षी दुर्गापूजेपासून ही शर्यत सुरू झाली हाेती. २०२१ ची सुरुवात हाेताच १२ जानेवारी राेजी विवेकानंद जयंतीदिनी दाेन्ही पक्षांनी रॅली काढून चढाआेढ दाखवली हाेती. त्यात तृणमूलने कार्यक्रमांच्या आयाेजनात भाजपला पिछाडीवर टाकले हाेते. तीच कसर भरून काढण्यासाठी आता २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी खुद्द माेदी मैदानात उतरतील. केंद्राने सुभाषचंद्र जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार असल्याची अधिसूचना जारी केली. मुख्यमंत्री ममतादेखील प्राेटाेकाॅल म्हणून व्यासपीठावर एकत्र असतील. आतापर्यंत पक्षाच्या मंचावरून ममतांनी भाजपला खडे बाेल एेकवले, या वेळी मात्र पदाचा गाैरव आणि पक्षाची प्रतिमा वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमाेर असेल.

बंगाली संस्कृतीशी नाळ दाखवण्याचे प्रयत्न
पश्चिम बंगालमध्ये राज्याचा इतिहास व संस्कृतीशी संबंधित महापुरुषांबद्दल नितांत आदर दिसून येताे. या गाेष्टी जनता बंगाली अस्मितेशी जाेडते. क्रीडा, कला, शिक्षण ही राज्यातील प्रत्येक घराची आेळख आहे. म्हणूनच लाेक सांस्कृतिक कार्यक्रमांशी थेट जाेडलेले असतात. २३ जानेवारीला व्हिक्टाेरिया मेमाेरियाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र माेदी व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दाेन्ही नेते बंगाली संस्कृतीशी नाळ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतील. यावरून बंगाली भावना जिंकणाऱ्यांचे पारडे आगामी विधानसभेत जड असेल .

माेदी साडेतीन तास मुक्कामी, व्हिक्टाेरिया मेमाेरियलला एकत्र
पंतप्रधान नरेंद्र माेदी २३ जानेवारीला काेलकातामध्ये दाेन कार्यक्रमात सहभागी हाेतील. नॅशनल लायब्ररित नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवादाला ते संबाेधित करतील. त्यानंतर ते व्हिक्टाेरिया मेमाेरियल हाॅल येथील प्रमुख कार्यक्रमात सहभागी हाेतील. येथे त्यांच्या हस्ते आझाद हिंद सेनेच्या सदस्यांचा गाैरव केला जाणार आहे. याच कार्यक्रमात मंचावर त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील. पंतप्रधानांच्या आधी त्यांचे भाषण हाेणार आहे. आतापर्यंत दाेन्ही पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम हाेतात.