आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप आढळल्यानंतर भारत सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांची कडक निगराणी सुरू केली आहे. असे असतानाही गेल्या मंगळवारी दिल्ली विमानतळावरून ५ कोरोना संक्रमित प्रवासी बेपत्ता झाले. त्यापैकी तिघांना रात्रीच शोधून राजधानीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उर्वरित दोघांपैकी एक प्रवासी लुधियानाला तर दुसरा आंध्र प्रदेशमध्ये पोहोचला. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नाही.
सूत्रांनी सांगितले की, ब्रिटनमधून दिल्लीला आलेला ४६ वर्षीय प्रवासी अमृतसरच्या पंडोरी गावातील रहिवासी आहे. प्राथमिक तपासणीदरम्यान तो कोरोना संक्रमित आढळला होता. पण तो अचानक विमानतळावरून गायब झाला. त्याने लुधियानाच्या एका खासगी रुग्णालयात तपासणी करून घेतली. लुधियानाचे अतिरिक्त उपायुक्त संदीपकुमार यांनी सांगितले की, अलर्ट मिळाल्यानंतर रुग्णाला बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. अशाच प्रकारे आणखी एक प्रवासी आंध्र प्रदेशमध्ये गेल्याचे कळले आहे. त्यालाही पुन्हा दिल्लीला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ब्रिटनहून गोव्यात परतलेल्या ११ प्रवासांना कोरोनाचा संसर्ग
पणजी | ९ डिसेंबरनंतर ब्रिटनहून गोव्याला आलेल्या ११ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ते म्हणाले, ब्रिटनहून गोव्यात आलेल्या ९७९ प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटन व यूएईहून आलेल्या ६०२ लोकांची यादी तयार केली आहे. त्या सर्वांची तपासणी केली जाईल.
पहिल्या टप्प्यामध्ये ५१ लाख लोकांना देणार लस : केजरीवाल
दिल्लीत पहिल्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेत ५१ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की,‘दिल्ली सरकारने नागरिकांच्या लसीकरणाची संपूर्ण तयारी केली आहे. आधी ३ श्रेणीतील लोकांना प्राधान्य दिले जाईल. त्यात आरोग्य सेवेतील ३ लाख कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन कर्मचारी आणि पोलिस तसेच नागरी संरक्षण सेेवेतील लोक यांचा समावेश आहे. त्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना लस दिली जाईल. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात एकूण ५१ लाख लोकांना लस दिली जाईल. त्यासाठी १ कोटी २ लाख डोसची गरज असेल. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जाणार आहेत. सध्या ७४ लाख डोस साठवण्याची क्षमता आहे. पुढील ५ दिवसांत १ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त डोस साठवण्याची क्षमता असेल. ज्यांची नोंदणी होईल, त्यांना आधी लस दिली जाईल. लस घेण्यासाठी कुठे जायचे आहे हे एसएमएसद्वारे कळवले जाईल.
ब्रिटनहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर चीनने घातली बंदी
बीजिंग | चीनने ब्रिटनहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. चीनने गेल्या मंगळवारी लंडन येथील आपले व्हिसा अर्ज केंद्रही तात्पुरते बंद केले होते. बिगरचिनी नागरिकांना चीनमध्ये येण्यास नोव्हेंबरपासून बंदी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.