आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनाक्रमावर योग्य तो तोडगा काढतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर योग्य तो तोडगा काढतील. माझा शिंदेच नव्हे तर कुणाशीही संवाद झाला नाही. शिंदेंनी ठाकरेंपुढे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची मला कल्पना नाही. किंवा त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचेही मला ठावूक नाही. पण, उद्धव यावर योग्य तो तोडगा काढतील व सरकार त्यांच्या नेतृत्वात यापुढेही सक्षमपणे चालेल असा मला ठाम विश्वास आहे', असे पवार यांनी स्पष्ट केले.
'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो फोल ठरला. त्यानंतर सलग अडीच वर्षे सरकार सुरुळीत चालत आहे. त्यामुळे भाजपकडून सरकार पाडण्याचे असे प्रयत्न होत आहेत,' असे पवार म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कालच्या निकालानंतर आपण नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिंदे-शहा भेटीवर बोलण्यास नकार
एकनाथ शिंदे व अमित शहांच्या प्रस्तावित भेटीविषयीही पवारांनी यावेळी बोलण्यास नकार दिला. 'कुणी कुणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझी मुख्यमंत्र्यांशीही याविषयी चर्चा झाली नाही. मी लवकरच मुंबईला जाईल. त्यानंतर पुढील पाऊले उचलली जातील,' असे ते म्हणाले.
आघाडीत मतभेद नाहीत
सत्ताधारी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. 'विधान परिषदेच्या निवडणुकीत थोडीफार क्रॉस व्होटिंग झाली. पण, क्रॉस व्होटिंगनंतरही सरकार चालते हा माझा 50 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे कालच्या निकालानंतर आमच्यात कोणतीही नाराजी नाही. थोडेफार इकतेतिकडे होते. पण, त्याचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. आघाडीत मतभेद नाहीत,' असे पवार म्हणाले.
भाजपबरोबर जाणार नाही
यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्रातील सरकार पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार काय? असा थेट प्रश्न पवारांना केला. त्यावर त्यांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट केले. 'आम्ही विरोधी बाकावर बसू. पण भाजपबरोबर जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या या प्रश्नावर पवार काहीक्षण हसल्याचेही दिसले. त्यामुळे त्यांच्या या हास्याचा नेमका काय अर्थ निघतो,' हे येणारा काळच ठरवेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.