आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील राजकीय संकट आता एका रोमहर्षक वळणावर पोहोचले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी आपल्या समर्थकांचा एक फोटो जारी करत आपल्याला 49 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन्ही काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याची तयारी दर्शविली आहे. पण यासाठी त्यांनी शिंदेंपुढे मुंबईत येऊन उद्धव यांच्यासोबत चर्चा करण्याची अट ठेवली आहे. दुसरीकडे, भाजपनेही शिंदेंपुढे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होईल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रकरणी तूर्त 7 शक्यता (सिनॅरियो) आहेत त्या अशा...
शक्यता -1 : शिदे शिवसेनेवर दावा सांगणार
एकनाथ शिंदे गुवाहाटीतच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते बनू शकतात. त्यानंतर विधानसभेच्या सभापतींना ई-मेल पाठवून विधानसभेतील आपल्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी करू शकतात. ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेत 8 महिन्यांपासून सभापतींचे पद रिक्त आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी सीताराम झीरवळ हे उपसभापती म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभी राहिली तर शिंदेंचा राष्ट्रवादीवर दावा सांगण्याचा डाव फसण्याची शक्यता आहे.
शक्यता -2: शिंदे सरकार स्थापन करण्याचा दावा करणार
एकनाथ शिंदे राज्यपालांपुढे भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सध्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते उद्धव सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे आदेश देऊ शकतात. विधानसभेच्या पटलावर असे घडले तर चेंडू पुन्हा सभापतींच्या कोर्टात जाईल. सभापती शिवसेनेच्या मागणीनुसार शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायद्याच्या जाळ्यात अडकवू शकतात.
शक्यता -3: ठाकरे आमदारांना मुंबईत बोलावण्याचा प्रयत्न करतील
उद्धव ठाकरेंच्या गटात केवळ 13 आमदार शिल्लक असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी व काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याची तयारी दर्शविली आहे. पण, यासाठी त्यांनी शिंदेंपुढे मुंबईत येऊन उद्धव यांच्याशी चर्चा करण्याची अट ठेवली आहे. बंडखोर आमदारांना मुंबईत बोलावण्यामागे उद्धव गटाचा छुपा उद्देशही असू शकतो. ते बंडखोरांना कोणत्याही प्रकारे मुंबईत बोलावून आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न करू शकतात. उद्धव गटाला हाच शेवटाच आशेचा किरण दिसत आहे.
शक्यता - 4 : प्रकरण गोव्याच्या राज्यपालांपर्यंत पोहोचू शकते
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोपवू शकते. यामुळे दोन उद्देश पूर्ण होतील. पहिला, कोरोना प्रोटोकॉल न मोडता राज्यपाल शिंदे आमदारांच्या समर्थकांची परेड करू शकतील आणि दुसरे म्हणजे ही सगळी उलथापालथ पणजीत होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाकडून बंडखोर आमदारांशी संपर्क होण्याची शक्यता कमी होणार आहे.
शक्यता-5 : प्रकरण न्यायालयात पोहोचू शकते
शक्यता 1 आणि शक्यता 2 मध्ये, विधानसभेत फ्लोअर टेस्ट किंवा सरकार स्थापनेचा गुंता अडकताच शिंदे किंवा भाजप कोर्टात जाऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये, सामान्यत: उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय विशिष्ट अटींसह विशिष्ट वेळेत फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देते. महाराष्ट्राच्या बाबतीतही हीच शक्यता प्रबळ आहे.
शक्यता - 6 : भाजप स्वतः सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते
शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस थेट राज्यपालांसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. या प्रकरणात राज्यपाल फ्लोअर टेस्टचे आदेश देऊ शकतात. फ्लोअर टेस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसेल. या प्रकरणात ते विश्वासाचे मत गमावतील. यानंतर शिंदेंच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करू शकते.
शक्यता-7: उद्धव राजीनामा देऊ शकतात
उद्धव यांनी राजीनामा दिला नाही तरच वर नमूद केलेली सर्व परिस्थिती शक्य होईल. मात्र, उद्धव यांच्या राजीनाम्याची शक्यता कमी आहे. उद्धव यांनी राजीनामा दिल्यास शिंदे आणि भाजपसाठी सोपे जाईल. राज्यपाल सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण पाठवतील. शिंदे कॅम्पसोबत भाजप नवीन सरकार स्थापन करणार आहे.
याशिवाय आणखी एक शक्यताही दिसून येत आहे. शिंदे गटाला शिवसेनेच्या खासदारांचाही पाठिंबा आहे. हे सर्व घेऊन ते निवडणूक आयोगाकडे जाऊन शिवसेनेच्या चिन्हावर दावा सांगू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.