आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैलवानांचे आंदोलन:पैलवानांकडून 20 मे पर्यंतचा अल्टिमेटम; कठोर कारवाई न केल्यास मोठे आंदोलन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
महापंचायतनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, पैलवानांच्या आंदोलनास १५ दिवस लोटले. आता आम्ही सरकारला आणखी १५ दिवस देतो. - Divya Marathi
महापंचायतनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, पैलवानांच्या आंदोलनास १५ दिवस लोटले. आता आम्ही सरकारला आणखी १५ दिवस देतो.

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवरून धरणे आंदोलनाच्या १५ व्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली. जंतर-मंतरवर रविवारी देशभरातील खापची महापंचायत झाली. साडेचार तास चाललेल्या महापंचायतीत बृजभूषण यांना अटक करावी यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत देण्यात आली. सायंकाळी कँडल मार्च काढला.

महापंचायतनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, पैलवानांच्या आंदोलनास १५ दिवस लोटले. आता आम्ही सरकारला आणखी १५ दिवस देतो. या प्रकरणात सरकारने तोडगा काढावा. २० मेपर्यंत तोडगा निघाला नाही तर २१ मेपर्यंत महापंचायत मोठे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

टिकैत म्हणाले, आंदोलनाचे नेतृत्व पैलवानच करतील. शेतकरी, इतर खाप व संघटना त्यास पाठिंबा देतील. त्याशिवाय सोमवारपासूनच खापमधील प्रत्येकी ११ लोक आंदोलनस्थळाकडे रवाना होतील, असा निर्णयही घेण्यात आला. ते सकाळपासून सायंकाळपर्यंत खेळाडूंसोबत राहतील.

आधी अटक, नंतर तपास करा
विनेश फोगाट व साक्षी मलिक म्हणाले, बृजभूषण शरण सिंह यांना आधी अटक करावी. त्यानंतर तपास करावी. कारण जोपर्यंत ते बाहेर राहतील तोपर्यंत तक्रार दाखल करणाऱ्या पैलवानांना धोका आहे.

मुले चुका करतात, तुम्ही चुकू नका : बृजभूषण
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांनी व्हिडिआे मेसेज जाहीर केला. त्यात ते म्हणाले, खापच्या माझ्या काका-मामांनो, मी तुम्हाला दिल्लीला येण्यापासून रोखत नाही. परंतु पोलिसांच्या तपासात मी दोषी आढळल्यास स्वत: तुमच्यासमक्ष हजर होईन. तेव्हा मला चपला-बुटांनी मारावे. मला एवढेच सांगायचे आहे. मुले चुका करतात. तुम्ही करू नका.

४ महिला संघटनांचा पाठिंबा
पैलवानांच्या आंदोलनाला चार राष्ट्रीय महिला संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर देशव्यापी निदर्शनांचे आवाहनही केले. अखिल भारतीय लोकशाही महिला संघ, भारतीय महिला राष्ट्रीय संघ, अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटना व अखिल भारतीय अग्रगामी महिला संघटना या चार संघटनांनी पाठिंबा दिला.

किशोरवयीन मल्लास धमकी
पॉक्सो कायद्यात तक्रार दाखल करणाऱ्या किशोरवयीन महिला पैलवानास धमकावले जात आहे. तिच्या एका बहिणीच्या वयाच्या प्रमाणपत्रावरून पीडितेला खोटे ठरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पैलवान म्हणाले, पीडितेने लवकरात लवकर न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवला पाहिजे.