आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या देशभरात झळकल्या होत्या. मात्र, मंगळवारी केंद्राने संसदेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू झाला नसल्याचे उत्तर दिले होते. त्यावर काँग्रेस, अापसह इतर विरोधी पक्षांनी सरकारने संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, भाजपने ऑक्सिजन बळींची आकडेवारी नसल्याचे खापर राज्य सरकारांवर फोडले आहे. तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगडने आमच्या राज्यांत ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याचे म्हटले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीनेही केंद्रावर जोरदार तोंडसुख घेतले. दुसरीकडे, महाराष्ट्राचे अारोग्यमंत्री खुद्द राजेश टोपे यांनीही राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे.
यामुळे आघाडीला राज्यात सरकारचा बचाव करावा लागला. दरम्यान, काँग्रेस नेते कपिल सिब्बल बुधवारी म्हणाले, सरकारने सभागृहाची दिशाभूल करणारे वक्तव्य केले अाहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, अाॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूंचा आकडा राज्यांनी केंद्राला पाठवायचा होता. मात्र राज्यांनी असा अहवालच दिला नाही.’
खा. संजय राऊत म्हणाले, केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल करा आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात ऑक्सिजन बळी नाही
मध्य प्रदेश : मंत्री म्हणाले, आम्ही व्यवस्था केली होती
मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी म्हणाले, ऑक्सिजनविना एकही मृत्यू झाला नाही. अाम्ही सगळी व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांनी रस्ते, रेल्वे तसेच हवाई मार्गानेही ऑक्सिजन उपलब्ध करून दिला.
माध्यमांच्या वृत्तांत ६२९ आॅक्सिजन बळींची नोंद
संशोधक, वकील व विद्यार्थ्यांच्या एका स्वतंत्र समूहाने यंदा दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंचा अहवाल तयार केला आहे. बातम्या, चौकशी पथके व रुग्णालयांच्या वक्तव्यांच्या आधारे तयार या दस्तऐवजात म्हटले आहे की, ६ एप्रिल ते १९ मे काळात देशातील ११० रुग्णालयांत ऑक्सिजनअभावी ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात घरीच मृत्यू झालेल्यांचा समावेश नाही.
दिल्ली : केंद्र त्यांच्या चुका लपवत आहे - सिसोदिया
उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया म्हणाले, “केंद्र चुका लपवण्याचा प्रयत्न करत आहे.’ दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, ‘ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर रुग्णालये कोर्टात का गेली?’
कर्नाटक : हायकाेर्टाच्या समितीकडून ३६ मृत्यूंना दुजोरा
कर्नाटक हायकाेर्टाच्या देखरेखीत स्थापन झालेल्या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चामराजनगरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ३६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.