आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट पवार-मोदींची, चर्चेला राऊत!:न सांगितलेले मुद्दे - केंद्रीय यंत्रणांची वक्रदृष्टी, ठाकरे-पवार कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले ईडीचे धागेदोरे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारमधील संघर्ष विकोपाला गेला असताना बुधवारी आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात उभय नेत्यांमध्ये सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्धची ईडीची कारवाई, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रलंबित ठेवलेला १२ आमदारांच्या निवडीचा मुद्दा आदी गोष्टी पंतप्रधानांच्या कानावर घातल्या, असे पवार यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

आघाडी सरकारचे मंत्री, नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आणि प्रत्युत्तरात राज्य सरकारने उघडलेली मोहीम या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे चर्चेला ऊत आला आहे. पवारांसोबत या वेळी खासदार मोहंमद फैझल होते. त्यांनी लक्षद्वीपसंबंधी प्रश्न मांडले.
पवारांनी न सांगितलेली भेटीमागची तीन कारणे...

१. राऊतांवरील कारवाई, १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्न, लक्षद्वीप येथील नायब राज्यपालांचा कारभार आदींविषयी भेटल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, या भेटीत राज्यात ईडीच्या गतिमान कारवाया व त्यातून आघाडीतील अस्वस्थता हा चर्चेचा मुख्य मुद्दा असल्याचे समजते.

२. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने आॅक्टोबरमध्ये छापे टाकले होते. आता ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची अलिबागची जमीन जप्त केली आहे. आघाडीच्या नेत्यांच्या कुटुंबीयांना छळू नका, अशी पवार यांनी मोदींना विनंती केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे.

३. ईडीचा पुढला निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय असल्याची भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्रीला दिलेल्या रकमेच्या नोंदीविषयी तपास सुरू आहे. त्याविषयी पवार बोलले असल्याचा सेना नेत्यांचा कयास आहे.

पवार म्हणाले, दोनच मुद्द्यांवर चर्चा - संजय राऊत यांच्यावरील कारवाई, राज्यपालांची तक्रार
नवाब मलिक, इतर मंत्र्यांविरुद्धच्या कारवायांबाबत विषय नाही

यापूर्वीच्या भेटी
२० नोव्हेंबर २०१९ : राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू असताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती.

१७ जुलै २०२१ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकारी संस्थांवरील केंद्रीय तपास यंत्रणांविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल : मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षांचा निर्णय आहे. हे तीन पक्षांचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे - ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकन्सी आहे, पण सध्या तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्षनेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू.

भाजपसोबत नव्हतो, जाणार नाही
ईडीने संजय राऊत आणि इतर नेत्यांवर कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका आहे का, असे विचारल्यानंतर पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येणार आहे. आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधी भाजपसोबत नव्हती. दुसऱ्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही,’ असे वक्तव्य पवार यांनी केले.

यूपीएच्या नेतृत्वाची इच्छा नाही
‘मी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्व करण्यास इच्छुक नाही. आघाडीत सर्वाधिक नंबर काँग्रेसकडे आहेत. मात्र बिगर भाजपप्रणीत पक्षांची मजबूत मोट बांधली जायला हवी,’ अशी भूमिका पवारांनी अधोरेखित केली. राज्यातील काँग्रेस आमदारांत आघाडी सरकारविषयी नाराजी असल्याचे माहिती नाही. आघाडीत एखादा पक्ष नाराज असला म्हणून सरकार अस्थिर असते, असे नसते,’ असेही पवार म्हणाले.

राज ठाकरे का बदलले माहिती नाही
‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्वी भाजपविरोधी होते, आता भाजपसोबत आहेत. राज यांनी मुद्दा घ्यायचा अन् भाजपने पाठिंबा द्यायचा, असा प्रकार सुरू आहे. भोंग्यांवर हनुमान चालिसा पठण करण्याला भाजपशासित राज्यांची संमती आहे का?’ ते का बदलले माहिती नाही. त्यांच्यावर बोलणार नाही, असे पवार म्हणाले.

रात्री प्रीतिभोजन, सकाळी भेटीगाठी
मंगळवारी रात्री पवार यांनी दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी प्रीतिभोजन आयोजन केले होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी मोदी-पवार भेट झाली. निमित्त राऊतांचे असले तरीही या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या मनसुब्यांबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, भेट पूर्वनियोजित होती. सोमवारीच उभय नेत्यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली होती, असे पवार यांच्या दिल्लीतील कार्यालयाकडून समजते.

पवार उवाच... : पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा झाली. मागील दोन-अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच पत्रकार तथा शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केली. हा अन्याय आहे. याकडे मोदींचे लक्ष वेधले, असे पवार यांनी सांगितले.

ईडी कारवाया : महाराष्ट्रातील कारवायांसंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली नाही, फक्त संजय राऊतांच्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडला. मंत्री नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल चर्चा झाली नाही. आम्ही आमचे दोन विषय पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की, मोदींना विनंती केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...