आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतराची लाट!:उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, राजीनामासत्र थांबेना; डॅमेज कंट्रोल... भाजपने सपा व काँग्रेसचे दोन आमदार फोडले

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना संसर्गाची लाट सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र राजीनाम्याची लाट सुरू आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांच्यानंतर योगी मंत्रिमंडळातील मागासवर्गीय नेते दारासिंह चौहान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे भाजपनेही काँग्रेस व सपातील दोन मागासवर्गीय आमदार फोडले. माजी वनमंत्री असलेले चौहान यांची ओबीसींतील लोनिया चौहान (सुमारे २.३%) जातीवर मोठी पकड आहे. राजीनाम्यानंतर ते म्हणाले, “पाच वर्षे मी ओरडून सांगत होतो. कुणी ऐकले नाही. मागास, वंचितांना ना सन्मान मिळाला ना न्याय. त्यांची उपेक्षाच झाली. इतर नेते मात्र चैन करत होते.’ आता कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू, असे ते म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस आमदार नरेश सैनी, सपाचे आमदार हरिओम यादव आणि सपाचे माजी आमदार धरपालसिंह यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भडाना रालोदमध्ये : चार वेळा खासदार राहलेले विद्यमान भाजप आमदार अवतारसिंह भडाना यांनी जयंत चौटालांच्या रालोदमध्ये प्रवेश केला. गुर्जर समाजावर भडाना यांची पकड आहे.

आमदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष हे आहे कारण
अधिकारी ऐकत नाहीत, अशी यूपीत भाजप आमदार आणि मंत्र्यांची तक्रार आहे. भाजपच्या २०० आमदारांनी १८ डिसेंबर २०१९ ला आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन केले होते. हे प्रकरण गाझियाबादचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांचे होते. तेव्हा नेतृत्वाने त्याला महत्त्व दिले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी तक्रार केली, पत्र लिहिले. खासदार संतोष गंगवार यांनीही तक्रार केली, पण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष दिले नाही.

राजीनाम्याच्या २४ तासांतच स्वामीप्रसाद यांच्याविरुद्ध वाॅरंट
योगी मंत्रिमंडळातून मंगळवारी राजीनामा दिलेले स्वामीप्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे. चिथावणीखोर वक्तव्याच्या २०१४ च्या प्रकरणात लखनऊच्या कोर्टाने मौर्य यांना २४ जानेवारीपर्यंत अटक करून हजर करण्याचे आदेश दिले. लग्नांत देवी-देवतांची पूजा करू नका, असे स्वामी यांनी बसपात असताना म्हटले होते.

३०% अतिमागासांची नाराजी महागात पडू शकते
स्वामीप्रसाद, दारासिंह, रोशनलाल वर्मा (लोधी), ब्रजेश प्रजापती आणि भगवती सागर अतिमागास समुदायातील आहेत. यूपीत ४२% मागासांत सुमारे १३.५% यादव आणि कुर्मी आहेत, तर ३०% अतिमागास जातींचे लोक आहेत. मागील निवडणुकीत अतिमागास वर्गातील अनेक नेते भाजपत आले होते. तथापि, सध्याच्या घडामोडींमुळे राजकीय चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. विश्लेषकांच्या मते, अतिमागास नाराज राहिले तर भाजपला ते महागात पडू शकते.

  • दारासिंह आणि स्वामीप्रसाद यांच्या राजीनाम्याची भाषा एकसारखीच आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत जारी फोटोची फ्रेमही एकसारखी आहे.
  • सीएम योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढतील यावर दिल्लीत भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत सहमती झाली. ते मथुरेतून लढतील अशी चर्चा आधी होती.