आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Flood Incident News And Updates; As Soon As It Gets Dark, People Go To The Forest Near The Village

गावात दहशत:अंधार पडू लागताच लोक गावाजवळील जंगलात निघून जातात; उत्तराखंडमधील रैणी गावातून थेट वृत्तांत

चमोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावकऱ्यांना जळतणाचीही नव्हती परवानगी, पण स्फोट होत

ऋषिगंगा नदीसोबत आलेल्या जीवघेण्या संकटाचा सगळ्यात जवळील साक्षीदार म्हणजे रैणी गाव. ऋषिगंगा वीज प्रकल्प रैणी गावाच्या घाटावर होता. आता त्याचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. हिमनदीसोबत आलेला ढिगारा उसळून काही मिनिटांत सर्वकाही सोबत घेऊन गेल्याचे गावकऱ्यांनी जवळून पाहिले. तेव्हापासून गावात दहशत पसरलेली आहे. डझनावर लोक डोळ्यादेखत गाळात रुतत गेल्याचे चित्र त्यांना अजूनही धक्क्यातून सावरू देत नाही. त्याशिवाय ऋषिगंगा नदीने पुन्हा विक्राळ रूप धारण करू नये, असे लोकांना वाटू लागले आहे. तेव्हापासूनच गावकऱ्यांनी आपल्या घरात झोपणे बंद करून टाकले. अंधार पडू लागताच आता लोक गावापासून दीड किलोमीटरवरील जंगलात निघून जातात. सकाळ झाल्यावरच ते घरी परततात.

रैणी गावातील निवासी कुंदनसिंह राणा म्हणाले, आमचे गाव आधीपासून अतिशय संवेदनशील भागात वसलेले आहे. येथे नेहमीच नैसर्गिक संकटांची शक्यता असते. मात्र येथे वीज प्रकल्प सुरू झाल्यापासून भीती आणखी वाढली आहे. प्रकल्पासाठी येथे सतत स्फोट केले जातात. त्यामुळे येथील शिखरे कमजोर होतात. या घटनेनंतर आता येथे राहणेदेखील धोकादायक बनले आहे.

काही वर्षांपूर्वी सरकारने पुनर्वसनासाठी एक यादी तयार केली होती. भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांसोबत रैणीचाही समावेश हाेता. आता ऋषिगंगामधील प्रलयानंतर पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकांनी या मागणीसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. गावातील अनेक घरांना या घटनेनंतर भेगा पडल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी, इतरत्र स्थलांतरित करा

गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गाव स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदनही देण्यात आले आहे. त्यासाठी लवकरात लवकर भौगोलिक पाहणी करण्याची लोकांची मागणी आहे. १९९८ मध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचा या गावालाही फटका बसला होता.

रैणी गाव १९७० मधील चिपको आंदोलनाची जन्मभूमी, कर्मभूमी

रैणी गावाला १९७० च्या चिपको आंदोलनाची जन्मभूमी व कर्मभूमी म्हटले जातो. या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली होती. हे आंदोलन सुरू करणारी गौरादेवी याच गावची रहिवासी होती. झाडतोड रोखण्यासाठी गावातील महिलांना पुढाकार घेतला होता. पर्यावरण संरक्षणासाठी आेळखल्या जाणाऱ्या हे गाव आता रिकामे करण्याची वेळ येत आहे. त्यामागेही पर्यावरणाचे कारण ठरले आहे. गौरादेवीचा मुलगा चंदरसिंह म्हणाले, या गावाशी जिव्हाळा आहे. त्याला सोडावे वाटत नाही. या दुर्घटनेनंतर गावाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. येथील देवी-देवतांच्या दर्शनासाठी पर्यटक आवर्जून भेट द्यायचे. त्यातून लोकांना रोजगारही मिळायचा.

गावकऱ्यांना जळतणाचीही नव्हती परवानगी, पण स्फोट होत

रैणी गाव नंदादेवी नॅशनल पार्कच्या सीमेत येेते. हा भाग पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. २०१९ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने येथे स्फोट रोखण्याचे आदेश दिले होते. त्याच वर्षी पार्कमध्ये समाविष्ट झाल्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांना जळतण जाळण्याचीही परवानगी दिली नव्हती. परंतु तेव्हा प्रकल्पासाठी मात्र सतत स्फोट केले जात होते, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. या उद्यानात अनेक जनावरांचीदेखील हत्या झाली. अनेक वर्षांनंतरही सरकारने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रचंड दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे आता तर सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवण्यात यावे. त्यांना राहण्याची सुविधा मिळावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...