आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरणात गुंतल्याने अन्य संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी बालकांना देण्यात येणाऱ्या अन्य लसींचा टक्का तब्बल ३५ टक्क्यांनी घटला आहे. विशेष म्हणजे, ८ लाख ६७ हजार बालके पोलिओ बूस्टर, तर १५ लाख ९२ हजार मुले धनुर्वाताच्या लसीपासून वंचित राहिली असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य आरोग्य कल्याण कार्यक्रमाच्या आकडेवारीतून पुढे येत आहे.
बालमृत्यू व बालकांच्या अनारोग्यास कारणीभूत संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो. त्यात बीसीजी, पोलिओ, कावीळ, गोवर, रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या आजारांविरुद्ध मुलांचे लसीकरण करण्यात येते. कोरोनापूर्व काळात या लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र, कोरोनापश्चात हे प्रमाण अवघ्या ५५ टक्क्यांवर घसरले आहे.
बालमृत्यू टाळण्यासाठी पोषणाप्रमाणेच लसीकरणाचा सूत्रबद्ध कार्यक्रम अत्यावश्यक असतो. अनेक वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने तो राबवण्यात आल्याने लसीकरणाचे प्रमाण १०० टक्क्यांच्या पुढे पोहोचले होते. मात्र, याच लसीकरण पथकांवर कोरोनाकाळात जनजागृती, उपचार आणि प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाची जबाबदारी टाकल्याने बालकांचे लसीकरण मागे पडले.
कोरोनापूर्व काळात लसीकरणाचे प्रमाण ९०% पुढे; कोरोनापश्चात अवघे ५५ टक्केच
२०१९ मध्ये १०० टक्क्यांच्या पुढे गेलेले लसीकरण २०२० मध्ये ८१%, त्यानंतर २०२१ मध्ये ५५ टक्क्यांवर घसरलेले आहे.
२०२०-२१ मध्ये सुमारे ८१ टक्के झाले होते लसीकरण
२०२०-२१ मध्ये बीसीजी लसीचे लक्ष्य १९.३२ लाख होते, १८.४५ लाख लसी दिल्या. पोलिओचे लक्ष्य १९.३२ लाख होते, पैकी १८.९९ लाख लसीकरण झाले. कावीळ बीचे उद्दिष्ट १९.३२ लाख होते, ११.५० लाख साध्य झाले.
२०१९-२० मध्ये १०० टक्के झाले होते लसीकरण
(संदर्भ - राज्य कुटुंब कल्याण)
सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात गुंतल्याने बसला फटका
दूरगामी दुष्परिणाम शक्य
सन २०२१-२२ (आकडे लाखांत)
लस लक्ष्य साध्य लसीकरण न झालेली बालके
बीसीजी 19.32 15.14 4 लाख 18 हजार
पोलिओ 19.32 13.71 5 लाख 61 हजार
कावीळ बी 19.32 9.50 9 लाख 82 हजार
गोवर व रुबेला 19.32 14.06 5 लाख 26 हजार
डीपीटी 18.94 13.28 5 लाख 66 हजार
पोलिओ बूस्टर 18.94 10.27 8 लाख 67 हजार
डीपीटी (5 वर्षे) 18.94 10.25 7 लाख 99 हजार
धनुर्वात (10 वर्षे) 12.14 10.16 15 लाख 92 हजार
धनुर्वात (16 वर्षे) 11.88 9.83 13 लाख 76 हजार
पेंटावॅलेन्स 19.32 13.67 5 लाख 65 हजार
मेंदूज्वर 2.99 2.04 95 हजार
मुळात लसीकरणाचा उद्देशच प्रतिबंधात्मक असतो. डोसेसचे प्रमाण व वेळापत्रक महत्त्वाचे असते. तेच या काळात विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर याचा निश्चितच परिणाम झालेला दिसतो आहे. त्यातही वंचित समूहातील, प्रकृतीने नाजूक कुपोषित बालकांसाठी तर हा मोठा धोका आहे.' - डॉ.अनंत फडके
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.