आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७३६ जिल्ह्यांत शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा सराव घेण्यात आला. यादरम्यान लस उत्पादक कंपन्यांकडून लस घेणे, ती लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवणे आणि लस टोचण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी घेण्यात आली. संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा दुसरा सराव होता. याआधी २ जानेवारीला सर्व राज्यांतील १२५ जिल्ह्यांत अशाच प्रकारची प्रक्रिया पार पडली होती.
दिल्लीत एका रुग्णालयात सरावाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तामिळनाडूच्या दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी चेन्नईत सांगितले की, ‘भारतात लवकरच लसीकरण सुरू होईल. आगामी काही दिवसांत आपण कोरोनाची लस आपल्या देशवासीयांना देण्यास सक्षम राहू. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना आणि त्यानंतर भारतीय लष्कर, निमलष्करी दलांतील जवानांना लस दिली जाईल. नंतर ५० वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल.’ देशात १३-१४ जानेवारीपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
लसीकरणाची खूण म्हणून बोटांवर शाई लावा : टोपे
मुंबई | महाराष्ट्रातही शुक्रवारी ११४ ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लसीकरणाची खूण म्हणून मतदानासारखीच शाई लावली जावी, अशी विनंती केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. त्याला परवानगी दिली तर ठीक नाही तर राज्य शासन त्याची अंमलबजावणी करेल. केंद्राकडून प्रत्यक्षात कोरोना लसीकरणाची तारीख कळवल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर महाराष्ट्रात लसीकरण मोहीम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असेही टोपेंनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.