आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21% भारतीयांना लसीचा पहिला डोस:जगभरात सारखाच ट्रेंड- जेथे 20% हून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला, तेथे त्यापुढील लाट आलीच नाही!

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंगल डोसही तीन महिन्यांपर्यंत संक्रमणापासून 50% सुरक्षा देतो

देशात २५.९८ कोटी (२०.९५%) लोकांना कोरोनाची लस दिली गेली. यातील ५.५२ कोटी (४.४५%) लोकांना दोन्ही डोस दिले गेले. जगभरातील ट्रेंड पाहता एक बाब स्पष्ट आहे की, ज्या देशातील २०% लोकांना लस मिळाली तेथे कोरोनाची पुढची लाट आली नाही. अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्स याची उदाहरणे आहेत. तज्ज्ञांच्या मते भारताने लसीकरणातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आता कोरोनाची पुढील लाट येण्यापूर्वी ७०% लोकांना लसीचा किमान एक डोस मिळणे गरजेचे आहे. देशातील विविध महामारीतज्ज्ञांच्या मते तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते.

देशात आतापर्यंत ३१ कोटीहून अधिक लसींचा वापर झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अाणखी ६५ कोटी लसी तयार होतील. म्हणजे एकूण ९६ कोटी लसी ऑक्टोबरपूर्वी वापरात येतील. देशात १८ वर्षांवरील लोकांची संख्या ८५ कोटींवर आहे. त्यामुळे ऑक्टोबरपूर्वी १८ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळणे शक्य होणार नाही. मात्र ७०% लोकांना पहिला डोस देणे शक्य आहे. भारतात आता लसीकरणाला गती मिळाली आहे. गेल्या ६ दिवसांत तब्बल ४ कोटी डोस दिले गेले. एवढे डोस एका महिन्यात दिले गेले होते.

4 उदाहरणे - यांनी लसीच्या भरवशावर लाट रोखली, आता आपली वेळ
1. अमेरिका
: दर ३ महिन्यांनी संक्रमणाची लाट येत होती. २०% लोकांना एक डोस मिळाल्यानंतर आता ती ५ महिन्यांवर गेली. पुढील लाट अजून आलेली नाही.
2. ब्रिटन : दर ३ महिन्यांनी संक्रमणाची लाट येत होती. २०% लसीकरणानंतर नवीन रुग्णांत घट सुरू झाली. तेव्हा ६५ हजार रुग्ण सापडत होते, आता फक्त १० हजार.
3. इटली : दुसरी लाट ३ महिन्यांनी, तिसरी लाट ४ महिन्यांनी आली. २०% लसीकरणाला ३ महिने झाले. रुग्ण घटत आहेत. पुढील महिन्यात देश मास्क फ्री होईल.
4. फ्रान्स : दर ३ महिन्यांनी लाट येत होती. फेब्रुवारीत २०% लसीकरण पूर्ण झाले. त्यानंतर चार महिने उलटले तरी अजूनही पुढील लाटेचे संकेतही नाहीत.

मात्र ब्राझीलचे उदाहरण धोक्याची घंटा, कारण...
ब्राझीलमध्ये ३० % लोकांना पहिला डोस मिळाल्यानंतरही चौथी लाट सुरूच आहे. तज्ज्ञांच्या मते ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाची लाट आधीपासूनच आहे. त्यामुळे लसीकरणाचा परिणाम अजून दिसून आलेला नाही. दुसरे कारण म्हणजे येथे चिनी लसही दिली जात असून ती परिणामकारक ठरताना दिसत नाही. तरीही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जुलैच्या मध्यापर्यंत तेथेही रुग्णांच्या संख्येत मोठी घट होईल.

तज्ञांचे मत - प्रो. के. श्रीनाथ रेड्‌डी, सदस्य, नॅशनल कोविड-19 टास्क फोर्स
20% लोकांना किमान एक डोस देण्यामागील काय उद्देश आहे?

एक डोस दिल्यानंतर किमान तीन महिन्यांपर्यंत संक्रमणापासून ५०% बचाव होतो. संक्रमण झाले तरी रुग्णालयात जाण्याची शक्यता कमीच असते. परिणामी लसीमुळे संक्रमणाचा प्रसार रोखण्याबरोबरच संक्रमित लोकांचे जीवन वाचवले जाऊ शकते.

लसीचा एक डोस संक्रमण रोखण्यात कितपत उपयोगी?
डेल्टा व्हेरिएंटवर ५०% उपयोगी आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अजून संशोधन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर टिप्पणी करणे योग्य नाही. याशिवाय भारतात जितके स्ट्रेन आणि व्हेरिएंट आहेत त्यांपासून बचावासाठी दिल्या जात असलेल्या तीन लसी ८०% हून अधिक प्रभावी आहेत.

एका डोसनंतरही संक्रमण झाले तर रुग्ण रुग्णालयात जाण्याची शंका किती टक्क्यांनी घटते?
सुमारे 70% पर्यंत. एवढेच नव्हे तर गंभीर अाजार असलेले संक्रमित झाले तरी त्यांच्या जिवाची जोखीमही घटते.

आकडे सांगतात... ३१ कोटी डोस दिले, ६५ कोटी ऑक्टो.पर्यंत मिळतील, या ९६ कोटी डोसद्वारे पुढील लाट थोपवणे शक्य
तज्ज्ञ म्हणतात... देशात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येणे शक्य, तोपर्यंत ७०% टक्के लसीकरण झाले तर लाट येणार नाही

बातम्या आणखी आहेत...