आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घोषणेच्या वादावर स्पष्टीकरण:'मी छत्रपती शिवजी महाराजांचा अपमान केला नाही'; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषावर आक्षेप घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या वादावरुन उपराष्ट्रपतींवरही टीका करण्यात आली. यानंतर आता स्वतः व्यंकय्या नायडू यांनी आपली बाजू मांडली आहे. 'मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. त्यांचा अनादर केलेला नाही,' असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.

व्यंकय्या नायडून यांनी ट्विटरवरुन आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, 'मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अनादर केलेला नाही. '

'व्यंकय्या नायडूंचे काहीच चुकले नाही'- उदयनराजे

"राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही. रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता." असे उदयनराजे भोसले म्हणाले. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरू असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. 

शपथविधीच्या वेळी शरद पवार देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे तेथे काय घडले त्यांना विचारा. कृपा करुन जे घडले नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंतीही उदयनराजे यांनी केली. 

घोषणेच्या वादात संजय राऊतांचीही उडी

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या विषयावर ट्विट केले आहे. त्यांनी भाजप आणि संभाजी भिडेंवर टीकास्त्र साधले आहे. राऊत म्हणाले की, 'छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. असे म्हणत त्यांनी जय भवानी!जय शिवाजी! अशी घोषणा ट्विटरवरून दिली आहे.