आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vikas Dubey Police Connection, SIT To Probe; The ED Also Sought Information On Dubey's Assets

एन्काउंटर:विकास दुबे-पोलिस लागेबांधे, एसआयटी करणार चौकशी; ईडीनेही दुबेच्या संपत्तीची माहिती मागवली

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबेचे विविध ठिकाणी 11 बंगले आणि 16 फ्लॅट; लखनऊमध्ये तब्बल 23 कोटींचा बंगला, तीन वर्षांत त्याने केले 14 विदेश दौरे
  • परदेशातील बँकांत बेनामी संपत्ती असण्याची शक्यता

कुख्यात गुंड विकास दुबे आणि उत्तर प्रदेश पोलिसांतील लागेबांधे तसेच यासंबंधी दाखल असलेल्या प्रकरणांची नव्याने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) कसून चाैकशी करेल. यासाठी दुबेचे गेल्या वर्षभरातील कॉल डिटेल्स तपासले जातील. अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी ३१ जुलैपर्यंत अहवाल सादर करेल. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) विकास दुबे, त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या टोळीतील इतर गुंडांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. ईडीने कानपूर पोलिसांकडून विकास, त्याचे कुटुंबीय व इतर साथीदारांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती मागवली आहे.

सूत्रांनुसार, विकास दुबेने मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केली होती. त्याची विविध ठिकाणी ११ घरे आणि १६ फ्लॅट असल्याचा संशय आहे. अशातच लखनऊमध्ये आर्यनगर भागात त्याने २३ कोटीत एक बंगला खरेदी केला होता. परदेशातही त्याची संपत्ती असल्याची शंका असून गेल्या तीन वर्षांत त्याने १४ वेळा परदेशात प्रवास केला होता. विकासच्या हस्तकांनी अरब अमिरात व थायलंडमध्ये मोठ्या मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.

एका गुप्त माहितीनुसार, विकास काही नामांकित व्यावसायिकांसाठी मनी लाँडरिंग करत होता. त्यामुळे त्याच्या मालमत्तांची चौकशी होणे आवश्यक आहे. विकास याला गेल्या गुरुवारी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात अटक केल्यानंतर शुक्रवारी सकाळी तो एन्काउंटरमध्ये मारला गेला होता. दरम्यान, विकासवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मोठा मुलगा आकाश लखनऊमध्ये आजी सरलादेवी यांना भेटण्यासाठी गेला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दोन सहकाऱ्यांना ठाण्यात अटक

मुंबई | विकास दुबेच्या दोन फरार सहकाऱ्यांना महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून अटक केली. आरोपी अरविंद ऊर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू तिवारी आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येतील आरोपी आहेत. २००१ मध्ये राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या संतोष शुक्लाच्या हत्येप्रकरणीही त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, विकास आणि त्याच्या साथीदारांना आश्रय देणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करण्यात येत आहे. ग्वाॅल्हेरमध्ये त्याच्या दोन गुंडांना आश्रय देणाऱ्या ओमप्रकाश पांडे आणि अनिल पांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.

एन्काउंटरची सीबीआय चौकशीची मागणी 

विकास दुबे व त्याच्या गुंडांच्या एन्काउंटरची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत शनिवारी दोन जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या. एन्काउंटरची चौकशी सीबीआय, एनआयए किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

एसआयटी करेल पोलखोल...किती पोलिसांचे साटेलोटे

> विकास दुबेवर दाखल गुन्ह्यात काय कारवाई झाली? शिक्षा देण्यासाठी ही कारवाई पुरेशी होती का? त्याचा जामीन रद्द करण्यासाठी काय प्रयत्न केले?

> विकासविरुद्ध जनतेकडून किती तक्रारी आल्या? कोणत्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली आणि या चौकशीचे पुढे पोलिसांत किंवा कोर्टात नेमके काय झाले?

> एक वर्षात विकासशी किती पोलिस संपर्कात आले आणि त्याच्यावर गँगस्टर अॅक्ट तसेच इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात कुणी दिरंगाई केली?

> विकास आणि त्याच्या साथीदारांनी काही सरकारी जमिनीवर ताबा मिळवला आहे का? असेल तर याला कोणता अधिकार जबाबदार?

0