आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी शुक्रवारी रांचीत नमाजानंतर हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी आंदोलकांनी महावीर मंदिरावर दगडफेक केली. या घटनेनंतर हिंदू संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत.
बिहारचे रस्ते बांधकाम मंत्री नितीन नवीन यांच्यावरही दंगेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची हल्लेखोरांपासून सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेले आहे. नवीन हे नितीश सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्री आहेत. तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. रांचीच्या मुख्य रस्त्यावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जीव वाचवण्यासाठी महावीर मंदिरात लपले लोक
महावीर मंदिरावर दगडफेक सुरू असताना लोक आपला जीव वाचवण्यासाठी मंदिरात लपून बसले होते. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार केला. जमावाने आमदार अमित यादव यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. भाजपच्या बहिष्कृत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी निषेध केला. या निषेधार्थ डेली मार्केटची तीन हजारांहून अधिक दुकाने सकाळपासून बंद होती. शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी त्यांना थांबवल्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यांची पोलिसांशी झटापट झाली. उर्दू लायब्ररी आणि महावीर मंदिराजवळ आंदोलकांनी दगडफेक सुरू केली.
फोर्स कमी होता
एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर बोलत असताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, 'साहेब दगडफेक चालू आहे, माझ्या कंबरेवर दगड लागलाआहे. माझा मोबाईल तुटला आहे. त्वरीत फोर्स पाठवा. साहेब दगडफेक होत आहे.'
मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद, ड्रोन मॉनिटरिंग
रांची डीआयजी अनिश गुप्ता मोर्चा सांभाळला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या सतत सोडण्यात आल्या. मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठेतील ५ हजारांहून अधिक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर अर्धा डझनहून अधिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे परिसरात नजर ठेवण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रॅपिड अॅक्शन फोर्स आणि इको कंपनीही तैनात करण्यात आली होती, मात्र ते सर्व कमी पडले.
गुरुवारच्या बैठकीतच ठरली होती रणनिती
गुरुवारी न्यू डेली मार्केट ट्रेडर्स असोसिएशनची बैठक झाली होती. या बैठकीत आंदोलनाची पूर्ण रणनिती ठरली होती. त्यात सर्वच दुकाने बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. तसेच शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्याचा निर्णयही यात घेण्यात आला होता.
सकाळपासूनच हिंसाचार न करण्याचे देत होते संदेश
मुस्लिम समुदायातील बुद्धिजिवी वर्ग सकाळपासूनच हिंसाचार न करण्याचे आवाहन करत होता. ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत होते. पण, त्याचा कोणताही परिणाम पडला नाही. या निदर्शनात मुले व वृद्धांचाही समावेश होता.
हिंसाचारामुळे शहरातील वाहतूक वेगवेगळ्या मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. मेन रोड व डोरंडात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तथापि, सर्जना चौक व डेली मार्केटमध्ये सकाळपासूनच वाहने रोखण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.