आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गालबोट:बिहारच्या 5 जिल्ह्यांत हिंसाचार; 2 ठिकाणी फायरिंग-बॉम्बस्फोट 1 ठार, 125 जणांना बेड्या, निमलष्करी दल तैनात

पाटणा​​​​​​​2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासाराम रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत तैनात जवान.  - Divya Marathi
सासाराम रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत तैनात जवान. 

बिहारच्या 5 जिल्ह्यांत रामनवमीच्या मिरवणुकीपासून हिंसाचार माजला आहे. नालंदाच्या बिहार शरीफ व सासारामध्ये गत 2 दिवसांपासून गोळीबार व बॉम्बस्फोट सुरू आहेत. नालंदात गोळी लागल्यामुळे 1 जण ठार झाला आहे. तर अन्य 2 ठिकाणी अनेक जण जखमी झालेत. दोन्ही ठिकाणी निमलष्करी दलाच्या 10 कंपन्या तैनात करण्यात आल्यात. बिहार शरीफ, सासाराम व गयेत 125 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

भागलपूर व गयेतही हिंसाचार झाला. मुंगेरमध्ये शनिवारी रात्री मूर्ती विसर्जनावरून 2 गट समोरासमोर आले. त्यानंतर दगडफेक व मारहाण झाली. पोलिसांनी लाठीमार करून स्थिती सांभाळली. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

सासाराम पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 च्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जण जखमी झाला. तपासात त्यांच्याकडेच बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांना अटक झाली. तर 3 जखमींना बीएचयूत दाखल करण्यात आले आहे. एका झोपडीतून एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या हिंसाचाराप्रकरणी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांच्याकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गृह मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्राने बिहारमध्ये अतिरिक्त कुमक पाठवण्यावर चर्चा केली. बिहारमध्ये लवकरच निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात येतील.

सासाराममध्ये आरोपींना अटक करून घेऊन जाताना पोलिस.
सासाराममध्ये आरोपींना अटक करून घेऊन जाताना पोलिस.

अपडेट्स...

  • केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, आता हिंदूंना मुक्तपणे पूजा करणे व मिरवणूक काढणे अवघड होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा.
  • गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी सासाराम येथे होणारी सभा रद्द झाली. येथे 5 आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सासाराम येथील शाळा-कॉलेज 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आलेत. येथे 1500 जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
  • बिहार शरीफमध्ये सुरक्षा दलाच्या 10 कंपन्या तैनात करण्यात आल्यात. आतापर्यंत येथे 11 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांचे आवाहन- अफवांपासून दूर राहा

रोहतास पोलिसांनी मुस्लिमांच्या भीतीने सासाराममधील हिंदू आपली घरे सोडत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ही पूर्णपणे निराधार व अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुणीही आपली घरे सोडली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. सासाराममधील परिस्थिती शांत व सामान्य आहे, असे ते म्हणाले.

सासाराममध्ये दुसऱ्या दिवशीही बॉम्बस्फोट

रोहतास जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सासारामच्या सफुलागंज भागात शनिवारी सायंकाळी पुन्हा बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी घरोघरी जाऊन शोधमोहीम सुरू केली. त्यात 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 25 जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री रामनवमीच्या मिरवणुकीपासून येथे हिंसाचार सुरू आहे. सहजलाल परिसरात दुचाकी पार्किंग व घोषणाबाजीवरून वाद झाला. एका गटाने वाहनांची तोडफोड केली. तसेच मिरवणुकीतून परतणाऱ्या लोकांना मारहाण केली.

याविरोधात दुसरा गट शुक्रवारी रस्त्यावर उतरला. सासाराम येथील बस्ती मोड, चौखंडी, आदमखनी, सोना पट्टी आदी भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी बॉम्बही फेकण्यात आले. काही घरांची जाळपोळ करण्यात आली. त्यात अनेक जण जखमी झाले. तेव्हापासून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. सासाराममध्ये 32 जणांना अटक करण्यात आली आहे.

नालंदाच्या बिहार शरीफमध्ये दगडफेक व गोळीबारानंतर फ्लॅग मार्च काढताना पोलिस.
नालंदाच्या बिहार शरीफमध्ये दगडफेक व गोळीबारानंतर फ्लॅग मार्च काढताना पोलिस.

बिहार शरीफमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार

नालंदाच्या बिहार शरीफमध्ये शुक्रवारी हिंसाचार झाला, तेथून 1 किमी अंतरावर शनिवारी रात्री पुन्हा गोळीबार झाला. त्यात 1 जण ठार, तर दोघे जखमी झाले. पोलिसांवरही दगडफेक झाली. यामुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बिहार शरीफमध्ये 77 जणांना अटक करण्यात आली आहे.

बिहार शरीफमध्ये शुक्रवारी रामनवमीच्या मिरवणुकीत गगन दिवाणजवळ दोन पक्ष एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. त्यानंतर संतप्त लोकांनी वाहने व घरांची जाळपोळ केली. तब्बल 1 डझन वाहने पेटवून देण्यात आली. गोळीबारही झाला. त्यात 6 जण जखमी झाले. येथे झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले.

गयामधील स्थिती शांत करताना पोलिसांचे जवान व अधिकारी.
गयामधील स्थिती शांत करताना पोलिसांचे जवान व अधिकारी.

गयामध्ये मिरवणुकीत हाणामारी

गया येथील चाकंद पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी सायंकाळी रामनवमीच्या मिरवणुकीवरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली. एका गटाने पोलिसांवर दगडफेकही केली. त्यात 2 पोलिस जखमी झाले. दगडफेकीनंतर अनेक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 16 जणांना अटक केली. सध्या पोलिस गावात तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.

भागलपूरमध्ये पोलिसांसोबत तळ ठोकलेले प्रशासकीय अधिकारी.
भागलपूरमध्ये पोलिसांसोबत तळ ठोकलेले प्रशासकीय अधिकारी.

भागलपूरमध्येही 2 गटांत हाणामारी

भागलपूरमधील नवगचिया येथील खारिक पोलिस ठाणे परिसरात शुक्रवारी रात्री रामनवमीच्या मिरवणुकीत 2 गटांत हाणामारी झाली. त्यात एका गटाची महिला गंभीर जखमी झाली. यामुळे येते एसडीओ उत्तम कुमार, एसडीपीओ दिलीप कुमार यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवगचियाचे एसपी सुशांत कुमार सरोज यांनी समाजकंटकांवर कडक नजर ठेवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

मुंगेरमध्येही हिंसाचार

मुंगेरमधील गधीरामपूर येथे शनिवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार झाला. समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यावरून स्थानिक व विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये दगडफेक झाली. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. अनेक जण जखमी झाले. 2 गावांतील तणाव पाहता एसडीएम, डीएसपीसह अनेक पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.